दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या उद्या-मंगळवारच्या ‘भारत बंद’ला काँग्रेससह विरोधकांनी रविवारी पाठिंबा जाहीर केला. विरोधकही मैदानात उतरल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ मिळाले आहे.

केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली राजधानीच्या सीमेवर गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत.

केंद्र सरकार नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य करीत नसल्याने शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष आणि दहा प्रमुख कामगार संघटनांनीही शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला होता. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, ‘आप’, शिवसेना आदी पक्षांनीही ‘भारत बंद’ला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर करणारे संयुक्त निवेदन विरोधकांनी काढले आहे.

‘भारत बंद’ला पाठिंबा देताना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ८ डिसेंबरला प्रत्येक जिल्ह्य़ात आणि प्रदेश पातळीवर काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात येतील. पक्षाची सर्व जिल्हा कार्यालये आणि प्रदेश कार्यालयांतील नेते -कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होतील.

तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष (टीआरएस) आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. ‘भारत बंद’ आंदोलन यशस्वी करण्यात ‘टीआरएस’चा सक्रिय सहभाग असेल, असे राव यांनी पक्षाच्या निवेदनात म्हटले आहे. कृषी कायद्यांचा मसुदा सादर झाल्यापासून शेतकरी त्याला सनदशीर मार्गाने विरोध करीत आहेत. ‘टीआरएस’नेही संसदेत कृषी कायद्यांना विरोध केला आहे, असेही राव यांनी स्पष्ट केले.

तमिळनाडूतील द्रमुकनेही ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला. कृषी कायदे मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्णत: रास्त आहे, असे पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी सांगितले. द्रमुकने कृषी कायद्यांच्या विरोधात शनिवारी राज्यव्यापी निदर्शनेही केली होती. अभिनेते कमल हासन यांच्या पक्षानेही ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही ‘भारत बंद’ला पाठिंबा व्यक्त केला. ‘आप’चे देशभरातील कार्यकर्ते ‘भारत बंद’मध्ये शांततेने सहभागी होतील आणि नागरिकांना बंद यशस्वी करण्याचे आवाहन करतील, असे ट्वीट केजरीवाल यांनी केले.

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने शनिवारी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला. पक्षाचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनीही, शनिवारी केंद्राने कृषी कायदे मागे घेऊन नवा मसुदा संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवावा, अशी मागणी केली होती.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मा.ले.), रिव्हॉल्युशनरी सोश्ॉलिस्ट पार्टी आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही शनिवारी पाटण्यात कृषी कायद्यांविरोधात निदर्शने केली.

इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा, सिटू, ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर आणि ट्रेड युनियन को-ऑर्डिनेशन सेंटर आदी कामगार-कर्मचारी संघटनांनीही ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे.

 शिवसेनेचेही समर्थन

शेतकऱ्यांच्या मागण्या आणि ‘भारत बंद’ला शिवसेना पाठिंबा देत आहे, अशी घोषणा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली. अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाविषयी रविवारी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेने ही घोषणा केली.

आंदोलन गांभीर्याने घ्या : शरद पवार  

मुंबई : शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्र सरकारने गांभीर्याने यावे, अन्यथा ते दिल्लीपुरते मर्यादित न राहता देशभर पसरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला. दरम्यान, या मुद्दय़ाबाबत शरद पवार हे बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

‘खेलरत्न’ परत करण्याचा विजेंदर सिंगचा इशारा

चंडीगड : केंद्र सरकारने नवे ‘काळे कृषी कायदे’ मागे न घेतल्यास ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार परत करण्याचा इशारा मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग याने रविवारी दिला. क्रीडाक्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे.