लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : वडाळ्याच्या गणेश मंदिर मार्गावर पुन्हा उभारण्यात आलेले बेकायदा ‘साईधाम मित्रधाम मंडळ मंदिर’ पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. त्यामुळे पालिके तर्फे  लवकरच या मंदिरावर पुन्हा कारवाई के ली जाणार आहे.

हे बेकायदा मंदिर टाळेबंदीनंतर पुन्हा जमीनदोस्त करण्याबरोबरच तिथे कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, या न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पालिकेने याआधीच न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली होती. तसेच मंदिरावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही दिली होती. २०१८ मध्ये मंदिरावर कारवाई झाल्यावरही पुन्हा बेकायदा मंदिर उभे राहिले. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांना प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. एकदा जमीनदोस्त केलेले हे मंदिर पुन्हा कोणी उभे केले हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे, त्यांची बाजू ऐकल्यावरच मंदिरावर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कु लकर्णी यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी मंडळाचे दोन पदाधिकारी उपस्थित झाले. त्यांनी मंदिरावर कारवाई करण्यास आपल्याला काहीच हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने मंदिरावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचे आदेश पालिके ला दिले.

याचिकेची दखल

या मंदिराचे बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिके ची दखल घेत न्यायालयाने २०१८ मध्ये मंदिर जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही मंदिर पुन्हा उभारण्यात आले. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर  टाळेबंदीनंतर मंदिरावर कारवाई करण्याची आणि तेथे कोणालाही प्रवेश न देण्याचे आश्वासित के ले होते. मात्र मंदिरात प्रवेश दिला जात असल्याची बाब पटेल यांनी अवमान याचिके द्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.