राज्यात करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १३ ऑक्टोबपर्यंतची संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन प्राणवायू (ऑक्सिजन), कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) आणि अतिदक्षता विभागातील (आयसीयू) ७,३५५ खाटा वाढविण्याच्या स्पष्ट सूचना राज्याला दिल्या आहेत.

दरम्यान, वाढता करोना प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील महिन्यापर्यंत पुरेशा खाटांची व्यवस्था न केल्यास रुग्णांचे हाल होतील, तसेच मृत्यूची संख्याही वाढेल, अशी भीती आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील रुग्णवाढीचा सखोल अभ्यास करून खाटांची संख्या वाढविण्याबाबत राज्य सरकारला सूचित केले आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात आजमितीस असलेले रुग्ण आणि १३ ऑक्टोबपर्यंतचे संभाव्य रुग्ण यांचे गणित केंद्र सरकारने मांडले आहे. राज्यात सध्या होत असलेल्या चाचण्यांचे प्रमाणही यात विचारात घेतले असून, चाचण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढविण्याची सूचनाही करण्यात आली आहे. अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण खूपच कमी असून दहा लाख लोकांमागे रोज ३८३ चाचण्या करण्यात येत आहेत. राज्यातील शासकीय करोना चाचणी प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने चाचण्या करत नसून त्यासाठी ठोस पावले उचलण्याबाबत केंद्र सरकारने बजावले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला पाठविलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार, १३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात दहा लाख ११ हजार ४०४ करोना रुग्ण होते. १३ ऑक्टोबपर्यंत ही संख्या १६ लाख ९६ हजार ९९१ वर पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील महिन्यात रुग्णालयांत मोठय़ा प्रमाणात खाटांची व्यवस्था करावी लागणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांत मिळून १३ सप्टेंबर रोजी ५६ हजार ३५६ ऑक्सिजन खाटा, अतिदक्षता विभागात १८ हजार ७८५ खाटा, तर ९३९८ व्हेंटिलेटर उपलब्ध होते. १३ ऑक्टोबपर्यंत जवळपास सहा लाखांहून अधिक वाढणारे करोना रुग्ण लक्षात घेता यात सात हजार ३५५ खाटांची वाढ करण्यात यावी, अशी स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. किमान अतिदक्षता विभागात चार हजार ३८५ खाटा, २५८४ व्हेंटिलेटर व ४०० ऑक्सिजन खाटा वाढविण्यास सांगण्यात आले आहे.