मुंबई : विक्रोळीच्या गोदरेज रुग्णालयात मंगळवारी दुपारी अक्षरश: आणीबाणीची वेळ आली होती. या रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा संपत आल्यामुळे पालिकेच्या एन विभागातील यंत्रणेने रुग्णालयातील १५ अत्यवस्थ रुग्णांना हलवण्याची तयारी सुरू के ली होती. रुग्णवाहिका तैनात ठेवल्या होत्या. संध्याकाळी साडेपाच वाजता ऑक्सिजनचा संपूर्ण साठा संपण्यापूर्वी सर्व रुग्णांना हलवण्याच्या तयारीत असतानाच रुग्णालयाच्या पुरवठादाराची गाडी आली आणि पुढचा सगळा धोका टळला.

रुग्णालयाकडे पुढील ३६ तासांचा ऑक्सिजनचा साठा असल्याची खात्री करून मग पालिकेची यंत्रणा तेथून हलवण्यात आली. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे राज्यात सर्वत्रच ऑक्सिजनचा साठा कमी पडू लागला आहे. ऑक्सिजनचा साठा संपल्यामुळे एकाच रुग्णालयातील अनेक रुग्ण दगावण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यातच मंगळवारी संध्याकाळी विक्रोळीतील गोदरेज रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आलेला असल्याचे लक्षात आले. तर ऑक्सिजनचा साठा परत कधी मिळणार यावर पुरवठादार काहीच उत्तर देत नसल्यामुळे खासगी रुग्णालयाचे व्यवस्थापनही हवालदिल झाले होते. त्यामुळे दुपारी तीन वाजल्यापासूनच एन विभागाचे अधिकारी, कर्मचारी रुग्णवाहिका घेऊन रुग्णालयाच्या आवारात जमले होते. मात्र वेळीच पुरवठादाराची गाडी आल्यामुळे रुग्णांना हलवण्याचे दिव्य टळले व रुग्णांच्या जिवावरील संकटही टळले.

एन विभागाचे साहाय्यक आयुक्त अजितकु मार आंबी यांनी याबाबत सांगितले की, ऑक्सिजनचा तुटवडा कोणत्याही रुग्णालयात निर्माण होऊ नये म्हणून आम्ही आधीच काही अधिकाऱ्यांची नियुक्ती के ली आहे. सर्व खासगी रुग्णालयांत रोज ऑक्सिजनच्या साठय़ाचा आढावा घेऊन कु ठे कमी साठा असेल याची माहिती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. गोदरेज रुग्णालयातील साठा संध्याकाळी साडेपाचपर्यंत संपेल असे आम्हाला कळले होते. साडेपाचनंतर या रुग्णालयाची ऑक्सिजन यंत्रणा कोलमडेल असे चित्र होते. रुग्णालयातील १५ रुग्णांना हलवावे लागणार होते. त्यामुळे आम्ही आमच्या काही रुग्णवाहिका व कर्मचारी दुपारी तीन वाजल्यापासूनच तैनात ठेवले होते.