पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहाची दुरवस्था; पुलंच्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमातच प्रशासकीय अनास्थेचा नमुना
‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ अर्थात पु. ल. देशपांडे यांच्या नावाने उभारलेल्या पु. ल. देशपांडे कला अकादमीची दूरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथे कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांना आणि उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना याचा अनुभव येत आहे. रविवारी सकाळी एका कार्यक्रमासाठी जमलेल्या प्रेक्षकांना हाच अनुभव पुन्हा एकदा आला. ऐन उकाडय़ाच्या दिवसांत सभागृहाची वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने श्रोते घामाघूम झाले. त्यातच बाहेर पावसाचा टिपूस नसताना सभागृहाच्या छतातून मात्र पाण्याची ‘मुसळधार’ गळती सुरू झाल्याने साऱ्यांचीच धांदल उडाली.
स्वरदा कम्युनिकेशन अॅण्ड इव्हेंट्स संस्थेतर्फे रविवारी पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव यांच्या संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या दस्तुरखुद्द यशवंत देवांसह श्रोत्यांना या दूरवस्थेचा अनुभव ‘याची देहि याचि डोळा’ घेता आला. पावसाने दडी मारल्यामुळे बाहेर ‘वैशाख वणवा’ पेटलेला असल्याने घामाघूम होऊन सभागृहात कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांना आता किमान सभागृहात तरी गारवा मिळेल, अशी अपेक्षा होती. पण सभागृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने उपस्थितांची पार निराशा झाली.
एकीकडे स्वत: देव नवोदित गायक-गायिकांना संगीताचे धडे देताना सुरांची बरसात करत होते तर दुसरीकडे अधूनमधून तेही घाम पुसत होते. हे कमी की काय, म्हणून सभागृहातील छतातून अचानक पाणी गळायला लागले. बाहेर पाऊस नाही आणि सभागृहात मात्र ‘धो धो’ पाणी असा चमत्कार अकादमीने घडवून आणला. पाणी पडत असल्याने तेथे बसलेल्या श्रोत्यांना उठून दुसरीकडे जावे लागले. अखेर कला अकादमीतील सफाई कर्मचारी काठीला लावलेले फडके आणि बादली घेऊन आले आणि त्यांनी फरशी पुसून काढली. थोडय़ा वेळाने तो ‘धबधबा’ अचानक थांबला.

पुलंच्या स्मृतिदिनीच प्रकार
’वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने झालेला त्रास इतका असह्य होता की आयोजक संस्थेचे उदय जोशी यांनी उपस्थित श्रोत्यांकडे दिलगिरी व्यक्त केली. असे काही होईल याची आम्हालाही कल्पना नव्हती, असे सांगून लवकरच पुन्हा एकदा कार्यशाळेचा हा कार्यक्रम विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केला जाईल, असे ते म्हणाले.
’पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी त्यांच्याच नावाने उभारलेल्या अकादमीत उपस्थित प्रेक्षक आणि मान्यवरांना अशा वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थित प्रेक्षकांनी व्यक्त केली.

वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने ती बंद पडली. त्यामुळे उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. वातानुकूलित यंत्रणा दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
संतोष रोकडे, प्रशासकीय अधिकारी, पु. ल. देशपांडे कला अकादमी