मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात ४० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या क्रीडा संकुलाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. त्यामुळे विविध क्रीडा स्पर्धामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरावासाठी खासगी संस्थांवर अबलंबून राहावे लागत आहे. जलतरण तलाव, जिमखाना, टेनिस कोर्ट आदी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येणे विद्यापीठाला शक्य होते.
देखभालीअभावी जलतरण तलावाचे डबके झाले आहे, तर टेनिस कोर्ट हे गर्दुल्ल्यांचा अड्डा बनले आहे. स्क्वॉश कोर्टचेही गोदाम झाले आहे, तर व्यायामशाळेसाठी लाखो रुपये खर्चून आणलेली साधने गेली दीड वर्षे वापराविना पडून आहेत. व्यायामशाळेत प्रशिक्षक नेमण्यासाठी येथील शारीरिक शिक्षण विभागाने पाठविलेला प्रस्तावही गेले सहा महिने धूळ खात आहे.   व्यायामशाळा सुरू होऊ शकलेली नाही. बास्केटबॉलसाठी साधने आणून ठेवली गेली, पण त्याची जोडणी कित्येक वर्षे झालेलीच नाही. नॅक समितीची पाहणी, एखादे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन किंवा सादरीकरण असले की, या संकुलाला बाहेरून तात्पुरती रंगसफेदी केली जाते. पण संकुलाच्या आतील भिंतींचे टायलिंग किंवा फरशी बसविण्याचे काम कधी झालेलेच नाही. सहा महिन्यांपूर्वी येथे ‘हिस्ट्री काँग्रेस’चे प्रदर्शन भरले होते. त्या वेळी या ठिकाणी लावण्यात आलेले मोठ्ठाले माहितीफलकही अद्याप संकुलातच पडून आहेत.
गेली दोन वर्षे या संकुलासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद केली जाते आहे. पण त्याचा वापर होत नसल्याने ही तरतूद यंदा तीन कोटींवर आणण्यात आली. हा प्रकार म्हणजे शुद्ध करंटेपणा आहे.
 प्रदीप सावंत, युवा सेनेचे सिनेट सदस्य

संकुलात खेळ सोडून अन्य शैक्षणिक उपक्रमच अधिक चालतात. विद्यापीठाच्या खेळा- विषयीच्या अनास्थेमुळे संकुल कित्येक वर्षे ‘जैसे थे’ आहे.
दिलीप करंडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य

काय ठरवले काय झाले..
डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या कुलगुरूपदाच्या काळात, २००३ मध्ये क्रीडा संकुलाची योजना पुढे आली. त्यासाठी त्यावेळी नऊ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तीन टप्प्यांत हे संकुल बांधायचे होते. व्यायामशाळेचे बहुउद्देशिय सभागृह, क्रिकेटसाठी मैदान, बैठक व्यवस्था असलेले फुटबॉल आणि हॉकी फिल्ड, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक, कबड्डी, खोखोसाठी मैदान, सॉफ्टबॉल, हॅण्डबॉल, बॅडमिंटनसाठी मैदान, जलतरण तलाव, हेल्थ क्लब, शूटिंग रेंज आदी क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना होती. पुढे डॉ. विजय खोले यांच्या काळात विद्यापीठाला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मिळालेल्या ३०० कोटींमधून ३१ कोटी रुपये या संकुलासाठी देण्यात आले. पण डॉ. खोलेंनंतर या संकुलाला कुणीच वाली उरला नाही. याचे बांधकाम करणाऱ्या इंजिनीअर आणि आर्किटेक्चरच्या वादात आजवर अर्धवट राहिले आहे. संकुलाच्या उभारणीत क्रीडा संचालकांचे मत तर कधीच लक्षात घेतले गेले नाही. जलतरण तलाव चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला आहे. त्यामुळे तो तोडून नव्याने बांधावा लागणार आहे.