28 October 2020

News Flash

पादचारी मार्गिकेचा प्रयोग फसला?

पालिका, वाहतूक पोलिसांच्या अनास्थेमुळे ‘सीएसएमटी’ परिसरातील योजना अपयशी

पालिका, वाहतूक पोलिसांच्या अनास्थेमुळे ‘सीएसएमटी’ परिसरातील योजना अपयशी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह अनेक ऐतिहासिक वारसा स्थळांचा परिसर असलेल्या ‘सीएसएमटी’ येथे पादचाऱ्यांना मुक्तपणे ये-जा करता यावे, यासाठी आखण्यात आलेली मार्गिका वाहतूक बेशिस्त आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे फसण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गिकेतून वाहनांची वर्दळ सुरू असतानाही पालिका आणि वाहतूक पोलीस यांनी त्याकडे लक्ष दिले नसल्याने ही योजना अपयशी ठरत आहे.

दक्षिण मुंबईत विविध कामास्तव येणाऱ्यांबरोबरच पर्यटकांचा वावर असलेला हा परिसर दिवसाच्या कोणत्याही वेळी वाहनांनी आणि पादचाऱ्यांच्या गर्दीने गजबजलेला असतो. पर्यटकांना हा परिसर कॅमेऱ्यात टिपायचा असतो. पण, त्यासाठी नेमकी जागा सापडत नाही. त्यामुळे ते भांबावून कुठे तरी उभे असतात. कामावर जाणारे कर्मचारी कसेबसे गर्दीतून वाट काढतात आणि त्यातच वेगाने जाणाऱ्या वाहनांची वर्दळ हे या  चौकातील नेहमीचेच चित्र. या सगळ्याला शिस्त लावण्यासाठी आणि पादचाऱ्यांना अधिक सुरक्षितपणे, सुलभतेने व सहजतेने चालता यावे, यासाठी या परिसरातील पादचारी मार्गांमध्ये प्रायोगिक स्वरूपात बदल केले आहेत. या भागात भडक पिवळ्या रंगाचे पट्टे आखून पादचाऱ्यांसाठी मार्गिका तयार करण्यात आली होती. दिवाळीपासून या प्रयोगाला सुरुवात झाली. या बदलाचा फायदा पादचाऱ्यांना होतो आहे. मात्र पालिका आणि वाहतूक पोलिसांच्या अनास्थेबरोबरच बेशिस्त वाहनचालक आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे हा प्रयोग धोक्यात आला आहे.

वाहतुकीचा मर्यादित वापर असणाऱ्या जागेवर पिवळ्या रंगाचे पट्टे आखून त्या जागा पादचाऱ्यांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. मात्र या जागा फेरीवाल्यांनी बळकावल्या आहेत. त्यात बेशिस्त दुचाकीस्वारही या जागेत अतिक्रमण करत आहेत. वाहनांना कमी जागा उरल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण सांगून पिवळ्या पट्टय़ांच्या बाजूस असलेल्या कुंडय़ा, दगड आत ढकलण्यात आले. तर बस आगाराच्या बाहेर सुलभ स्वच्छतागृहाजवळील मोकळ्या जागेत फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटली आहेत.

वाहतूक पोलीस नकारात्मक

आता वाहतूक पोलिसांनी देखील याबद्दल नकारात्मक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. पादचाऱ्यांचा फायदा होत असला तरी वाहतूक कोंडी वाढली असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे काही बदल करता येतील का यावर पुढील टप्प्यात विचार केला जाईल असे सांगितले.

पिवळे पट्टे बेरंग

पादचाऱ्यांकरिता आखून दिलेल्या या पिवळ्या पट्टय़ांवर पुरेशी साफसफाई देखील होत नसल्याने काही ठिकाणी त्यांचा रंग उडून ते पुसट झाले आहेत. तर बसण्यासाठी ठेवलेल्या बाकांवर गर्दुल्ले, भिकारी पथारी पसरताना दिसतात.

बदल कुठे?

चौकात सीएसएमटी आणि पालिका इमारतीच्या समोरील माता रमाबाई आंबेडकर रस्त्यापासून ते भाटिया उद्यानापर्यंत हा बदल करण्यात आला. नवीन बदलात आझाद मैदानाबाहेरील खाद्यपदार्थाच्या स्टॉलजवळ पदपथाबाहेर जागा सोडल्यामुळे पादचाऱ्यांना चालायला जागा मिळू लागली. आराम हॉटेलसमोरच्या जागेत पादचाऱ्यांना बसण्याची व्यवस्था केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 4:27 am

Web Title: pedestrian route experiment fail at cstm station zws 70
Next Stories
1 विद्यार्थ्यांचे प्रबंध वाळवीच्या मुखी
2 दादरमध्ये पालिका मंडईबाहेर तांदळाच्या भुशाचा ढीग
3 ‘मेट्रो ३’चे ७० टक्के भुयारीकरण
Just Now!
X