‘बेस्ट’ उपक्रमाच्या धोरणाचे दृश्य परिणाम; क्षयरुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्क्यांवर

‘काही केल्या खोकला बरा होत नव्हता. विविध तपासण्या केल्या तेव्हा क्षयरोगाचे निदान झाले. ‘बेस्ट’ व्यवस्थापनाने तातडीने भरपगारी रजा मंजूर केली. शस्त्रक्रियेसाठी एक लाखाची मदत केलीच, पण कुर्ला आगारात बैठे कामही दिले. मी राहणाऱ्या झोपडपट्टीत होणारा श्वसनाचा त्रास पाहून कामाच्या ठिकाणापासून जवळच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत घरही दिले. आज मी यातून व्यवस्थित बरा होऊन बाहेर पडलो ते केवळ ‘बेस्ट’मुळेच’..

५१ वर्षीय प्रदीप माने यांना ‘बेस्ट’ प्रशासनाकडून आलेला अनुभव हा अपवाद नाही, तर कर्मचाऱ्यांना क्षयरोगाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आखलेल्या धोरणाचा दृश्य परिणाम आहे. २०११मध्ये ‘बेस्ट’ने आखलेल्या धोरणामुळे क्षयरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्क्यांवर आले आहे. एवढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय कर्मचारी संघटनेनेही या कामगिरीची दखल घेत जगभरातील कंपन्यांना हा कित्ता गिरवण्याचा सल्ला दिला आहे. यांच्यात तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण नेहमीच जास्त राहिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची लागण होण्याचे प्रमाणही जास्त होते. याची गंभीर दखल घेत ‘बेस्ट’ प्रशासनाने २०११मध्ये कर्मचाऱ्यांसाठी क्षयरोगाचे स्वतंत्र धोरण तयार केले. क्षयरोगाचे निदान वेळेत करण्यासाठी वर्षांतून दोन वेळेस जनजागृती शिबिरे बेस्टकडून घेण्यात येतात. क्षयरोगाच्या रुग्णांचा पाठपुरावा करण्यासाठी यांच्या नोंदी पालिकेला कळविल्या जातात. याचा पुढचा टप्पा म्हणजे उपचार. पालिकेच्या सर्व रुग्णालये आणि डॉट्स केंद्र येथे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे प्राधान्याने उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. कर्मचारी आजारी पडला की त्याच्या कुटुंबावरच त्याची जबाबदारी येते. अशावेळी पूर्णपणे बरे होण्यासाठी एक ते तीन वर्षांची भरपगारी रजा दिली जाते. निदानापासून उपचार, रुग्णालयातील उपचार याकडे बेस्टचा आरोग्य विभाग जातीने लक्ष घालून पाठपुरावा करतो. रुग्ण बरा झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन रुजू होण्यास आल्यानंतर त्याच्या संपूर्ण तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये शंका आल्यास पुन्हा रजेवर पाठवून उपचारावर लक्ष केंद्रित केले जाते. क्षयरोगबाधित रुग्णाला कोणत्याही प्रकारचे अंपगत्व आल्यास त्याचे मूळ वेतन कायम ठेवून कामाचे स्वरूप बदलले जाते.

एकीकडे क्षयरोगाबाबत समाजामधील अढी कायम असताना दुसरीकडे ही अढी दूर करून कर्मचाऱ्यांना उपचार घेऊन पूर्णपणे बरे होईपर्यंत पाठपुरावा करण्याच्या बेस्टच्या धोरणामुळे गेल्या चार वर्षांत क्षयरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्क्यांवर आले आहे. रुग्णांची संख्येतही घट झाली आहे. औषधांना प्रतिरोध निर्माण झालेल्या एमडीआर आणि एक्सडीआर रुग्णांची संख्याही कमी होत आहे.

गेली आठ वर्षे बेस्ट या धोरणाची अंमलबजावणी योग्यरीतीने करत असून याची दखल आंतराष्ट्रीय कर्मचारी संघटनेनेही घेतली आहे. क्षयरोगमुक्तीसाठी सर्व कंपन्यांमध्ये असे धोरण राबवावे, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात येणार आहे. तसेच नुकतेच अमेरिकेच्या युनायटेड स्टेट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट संस्थेनेही बेस्टच्या आरोग्य विभागाला भेट देऊन कौतुकाची थाप दिली आहे.

 

अनेक वेळा प्रयत्न करूनही एखादा कर्मचारी योग्यरितीने उपचार घेत नसल्यास त्याला दिल्या जाण्याऱ्या भरपागारी रजेपासून अनेक फायदे बंद केले जातात. त्यामुळे रुग्ण उपचार घेण्यास टाळाटाळ करत नाहीत. त्यामुळे क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी कामाच्या ठिकाणी अशारितीने क्षयमुक्त धोरण राबविणे गरजेचे आहे.

– डॉ. अनिलकुमार सिंघल, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, ‘बेस्ट’