मुंबई : गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनचा, पण तो अल्बर्ट आइन्स्टाइनने मांडल्याचे चुकीचे विधान रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केले होते, त्याबद्दल त्यांनी  शुक्रवारी सीएसएमटी येथील रेल्वे कार्यक्रमात आपल्या चुकीची कबुली दिली.

मी गुरुत्वाकर्षणाचा शोध आइन्स्टाइनने लावल्याचे विधान केले होते, ही चूक माझी होती. ती सुधारल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.

सध्याच्या आर्थिक विकास दरावर बोलताना भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटींची कशी बनणार या प्रश्नावर गोयल यांनी देशाला १२ टक्के विकासदराने वाटचाल करावी लागेल आणि आता सहा टक्के दराने वाढ होत असल्याचे सांगितले होते. आकडे आणि गणिताची चिंता केली असती तर प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी गणिताचा उपयोग कधीही झाला नसता, असे विधान गोयल यांनी गुरुवारी केले होते. यावर त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली. विरोधकांनीही त्यांच्यावर टीका केली.

गोयल यांनी सीएसएमटी येथील कार्यक्रमात  आपली चूक मान्य केली. चूक कोणाकडूनही होते. आपण काहीही नवीन न करता याच विषयांत अडकून बसतो. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचारावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जो माणूस चुका करत नाही तो कधीच नवनिर्मिती करू शकत नाही, हे आइन्स्टाइनचे विधान त्यांनी उद्धृत केले.

तावडे, गुगल पाहा – दलवाई

१९५६ नंतर कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्रीपदाचा काळ पूर्ण केला नाही. देवेंद्र फडणवीस यांनीच हा काळ पूर्ण केल्याचे वक्तव्य गोयल यांनी शुक्रवारी सीएसएमटी येथील कार्यक्रमात केले. त्यावेळी मंचावर बसलेल्या खासदार हुसेन दलवाई यांनी व्ही. पी. नाईक यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याची आठवण करून दिली. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना इंटरनेटवर याची पडताळणी करा, असेही ते म्हणाले.