संदीप आचार्य

करोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये रक्तद्रव (प्लाझ्मा) उपचारपद्धती उपयुक्त असल्याचे आढळून येत नाही. तसेच मृत्युदर रोखण्यातही तिचा उपयोग नसल्याचे दिसून आल्याने करोना उपचार मार्गदर्शक तत्त्वांमधून ही उपचारपद्धती काढून टाकण्याचे संकेत अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिले आहेत. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रात करोनाच्या गंभीर रुग्णांवरील प्लाझ्मा उपचारपद्धतीचे प्रयोग सुरूच राहतील, अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने घेतली आहे.

जगातील सर्वात मोठा अभ्यास आयसीएमआरने केला असून देशभरातील जवळपास ३९ रुग्णालयांतून ४६४ गंभीर करोना रुग्णांवर प्लाझमा उपचार करण्यात आले. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला असून करोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये या उपचार पद्धतीचा उपयोग होत नसल्याने ती राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वामधून रद्द करण्याचा विचार करत असल्याचे आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गव यांनी सांगितले. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय ‘राष्ट्रीय कृती दला’च्या माध्यमातून घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने राज्यात मोठय़ा प्रमाणात याबाबत केंद्र सुरू केली असून करोना रुग्णांना होणाऱ्या उपयोगावरून तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू करण्यात आले असून आता  १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच मुंबई महापालिकेच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझमा थेरपी सेंटर सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची काय भूमिका आहे, असे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना विचारले असता ते म्हणाले, आयसीएमआरच्याच परवानगीने राज्यात पाच हजार गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी वापराचा अभ्यास सुरू झाला असून आम्ही तो थांबवणार नाही. आयसीएमआरने याबाबत कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नसून केवळ मृत्युदर कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त नसल्याचे म्हटले आहे.

तथापि राज्यात अनेक कमी गंभीर रुग्णांमध्ये ही थेरपी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत अभ्यास होण्याची गरज असून लवकरच आम्ही तो सुरूकरू असे लहाने यांनी सांगितले.

तज्ज्ञांचे मत..

* प्लाझ्मा थेरपी ही १२० वर्षे जुनी असून आतापर्यंत साथीच्या रोगांमध्ये त्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्यात आल्याचे सांगून राज्य कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, जगभरातील अभ्यासात करोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाची लक्षणे असलेल्या नव्या रुग्णाला पहिल्या काही दिवसांत प्लाझ्मा दिल्यास त्याचा उपयोग होतो, असे दिसून आले आहे. मात्र अँन्टिबॉडी लेव्हल म्हणजे प्रतिकारशक्ती नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

*  करोनातून बरे झालेल्या रुग्णाने सहा ते आठ आठवडय़ांपूर्वी प्लाझ्मा दान करू नये, असेही डॉ. जोशी यांचे म्हणणे आहे.

*  रुग्ण निहाय प्लाझ्मा थेरपीचा निर्णय घेता येऊ शकतो तसेच करोना आढळून आल्याबरोबर पहिल्या टप्प्यात प्लाझ्मा दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो असे राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले.