मुंबईत दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरवासियांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मुंबईतील निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून असून यासाठी केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे ट्विट मोदींनी केले आहे. मुंबईकरांनी स्वत:ची काळजी घ्यावी आणि सुरक्षित जागी थांबावे, असे आवाहनदेखील मोदींनी केले आहे. आज सकाळपासून मुंबईत प्रचंड पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत.

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधत शहरातील परिस्थितीची माहिती घेतली आहे. मोदींनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, अशीही माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. ‘मुंबईकरांनी स्वत:ची काळजी घ्यावी आणि सुरक्षित स्थळी राहावे,’ असे आवाहनदेखील मोदींनी केले.