मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाचा म्हणजेच अमित ठाकरेचा विवाह सोहळा चर्चेत आला आहे तो निमंत्रितांमुळे. ज्या निमंत्रितांना बोलवण्यात आलं आहे त्या यादीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नावंच नाहीत अशी माहिती समोर आली आहे.

२७ जानेवारीला अमित ठाकरे मुंबईत लग्न करणार आहेत. राज ठाकरेंनी या लग्नासाठी राजकीय वर्तुळापासून ते सिनेविश्वापर्यंत अनेकांना लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. अगदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एवढ्या सगळ्या मान्यवरांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांची नावं नाहीत असे समजते आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

दिल्लीत राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपामधील काही नेते, मंत्री या सगळ्यांना लग्नाचे आमंत्रण देण्यात आलं मात्र मोदी आणि शाह या दोघांनाही बोलावण्यात आलेलं नाही. आता हा विषय चर्चेचा ठरतो आहे.

राज ठाकरेंच्या निमंत्रितांच्या यादीत कोणाची नावं आहेत?
अर्थमंत्री अरूण जेटली<br />गृहमंत्री राजनाथ सिंह
दळणवळण मंत्री नितीन गडकरी
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन
महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी
शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान
ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी
ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी
राज्यमंत्री सत्यपाल सिंह

काँग्रेसमधून कोण?
राहुल गांधी
सोनिया गांधी
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

या सगळ्यांसोबतच रिपाइं नेते रामदास आठवले यांनाही निमंत्रण पाठवल्याचे समजते आहे.

राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह या दोघांनाही निमंत्रण दिले नसल्याची चर्चा आहे. असे असले तरीही लग्नासाठी अजून काही कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत ते या दोघांना निमंत्रण देण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात तूर्तास जी यादी हाती आली त्यात तरी मोदी आणि शाह यांची नावं नाहीत हेच समजते आहे.