कोपर्डी, तळेगाव येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याच्या घटनांनी समाजमन खवळले असतानाच अलिबाग तालुक्यातही अशीच एक घटना घडली. अशा वेळी पोलिसांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अवघ्या १२ तासांत नराधम आरोपीला बेडय़ा ठोकल्या.

अलिबाग तालुक्यातील श्रीगाण आदिवासी वाडी येथे राहणारी १६ वर्षांची मुलगी लतिका (नाव बदललेले आहे.) एका सामाजिक कार्यक्रमासाठी १२ ऑक्टोबर २०१६ रोजी घरातून बाहेर पडली. लतिका या कार्यक्रमावरून सायंकाळी परतणे निश्चित होते; परंतु संध्याकाळ उलटून रात्र चढू लागली तरी, ती घरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला. ज्या ठिकाणी लतिका गेली होती तो परिसर तिच्या पायाखालचा होता. तेथून घराकडे येणारी वाटही ओळखीचीच. त्यामुळे सुरुवातीला ती कोणा मैत्रिणीकडे गेली असावी, अशी तिच्या आई-वडिलांनी स्वत:चीच समजूत काढली; परंतु रात्रीचे १२ वाजले तरी लतिका घरी न परतल्याने त्यांच्या जिवाला घोर लागला. त्यांनी आता तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.

लतिकाच्या पालकांनी ती ज्या कार्यक्रमासाठी गेली होती, ते ठिकाण पहिल्यांदा गाठले; परंतु लतिका कार्यक्रम संपताच सायंकाळीच तेथून निघाल्याचे त्यांना समजले. हा कार्यक्रम डोंगरावरील एका आदिवासी वाडीजवळ होता. तेथून घरापर्यंतचा रस्ता लतिकासाठी नवीन नव्हता. त्यामुळे नेमके काय झाले, असा प्रश्न तिच्या आई-वडिलांना पडला. त्याच वाटेवर रात्रीच्या काळोखात लतिकाचा शोध घेत ते परतत असताना एका निर्जन स्थळी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आपली मुलगी दिसली. लतिकाचा तो निष्प्राण मृतदेह पाहून तिच्या आई-वडिलांवर आकाशच कोसळले. एका सामाजिक कार्यक्रमासाठी गेलेली आपली मुलगी घरी परतण्याऐवजी अशा अवस्थेत सापडल्याचे पाहून त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले.

लतिकाच्या आईने तशा अवस्थेतही मोठय़ा धिराने पोयनाड पोलीस ठाणे गाठले. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला होता. लतिकाच्या आईची कैफियत ऐकून घेत पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भादंवि कलम ३०२, ३७६ (अ) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून  संरक्षण अधिनियम कलम ४, ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला. कोपर्डी आणि तळेगाव येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटना याच काळात घडल्या होत्या. त्यावरून अवघे समाजमन खवळून उठले होते. कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत होतेच; परंतु जातीय तेढही वाढीस लागली होती. अशा परिस्थितीत लतिकाची हत्या झाल्याने या प्रकरणाचेही गांभीर्य आणखी वाढले होते. त्यामुळे रायगड पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवण्यास सुरुवात केली.   तत्कालीनपोलीस अधीक्षक सुवेझ हक आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजय कुमार पाटील यांनी स्वत: घटनास्थळाला भेट दिली. पोयनाड पोलिसांसह तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या पथकांकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली. यासोबतच न्यायवैद्यक तपासणी पथक, श्वान पथक यांनाही पाचारण करण्यात आले. तोपर्यंत डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत हत्येपूर्वी लतिकावर अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने आपला तपास केंद्रित केला.

पोलीस पथकांनी डोंगरावरील आदिवासी पाडय़ावर जाऊन चौकशी सुरू केली; परंतु ठोस धागा सापडत नव्हता. घटनेचे ठिकाण आदिवासी वाडीपासून जवळच असल्याने या वाडीतील कोणी तरी हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा दाट संशय होता; परंतु त्यासाठी एखादा माग सापडणे आवश्यक होते. अशातच आदिवासी वाडीवर राहणारा दिलीप संजय नाईक हा सायंकाळी लतिकाशी बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अजिबात वेळ न दवडता दिलीपला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो आपण निदरेष असल्याचे सांगून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला; परंतु पोलिसांचा दट्टय़ा पडताच तो ताळ्यावर आला व त्याने लतिकाच्या हत्येची कबुली दिली.  पाचवी पूजनाचा कार्यक्रम उरकून लतिका घराकडे परतत असताना दिलीपने वाटेत तिला थांबवले व शरीरसुखाची मागणी केली. लतिकाने याला नकार देताच या दोघांमध्ये झटपट झाली. या बाचाबाचीमुळे संतापलेल्या दिलीपने लतिकाला मारहाण करत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करून तो पळून गेला. हत्येदरम्यान रक्ताने माखलेले आपले कपडे धुवून त्याने ते दडवून ठेवले होते; परंतु पोलिसांनी ते कपडे व अन्य पुरावे ताब्यात घेतले.

पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तपासकौशल्य यामुळे लतिकाची हत्या करणाऱ्या नराधमास अवघ्या १२ तासांत अटक करण्यात आली. या तपासात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख जितेंद्र व्हनकोटी, पोयनाड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एन. राजे, पोलीस हवालदार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाची सुनावणी सध्या अलिबाग येथील सत्र न्यायालयात सुरू आहे.