समाजमाध्यमांच्या आधारे खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना कशी मदत होते, याचा उत्तम नमुना धारावी पोलीस ठाण्याच्या पथकाने भविष्यातील तपासासाठी ठेवला आहे. ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर ग्रुप बनवून तपास पथकाने बिहारला पळून जात असलेल्या गुन्हेगाराला चार तासांत पकडले, त्याची ही कहाणी..

होळीच्या बंदोबस्तात व्यस्त पोलिसांना धारावीतील एका गल्लीत ३२ वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळला. ओळख पटेल असा कोणताही पुरावा मृतदेहाशेजारी आढळला नाही. त्यामुळे तो कोणाचा असावा, यापासूनच तपासाला सुरुवात झाली. मात्र मृतदेहाजवळ एक रिकामी पुंगळी सापडली होती. कोणीतरी त्याच्या कपाळावर गोळी झाडल्याची खूण होती. ओळख पटू नये, यासाठी मारेकऱ्याने मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला होता. बाजूलाच रॉकेलचा रिकामा डबाही आढळला. अंतर्गत वैमनस्यातून हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक निष्कर्ष धारावी पोलिसांनी काढला.

धारावीसारख्या नेहमीच गजबजलेल्या परिसरात मारामारी, खुनाच्या घटना नवीन नाहीत. मात्र गेल्या काही महिन्यांत गोळीबाराची कुठलीही घटना घडली नव्हती. या खुनात गावठी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी रस घेतला होता आणि कोणत्याही परिस्थितीत आरोपीला पकडण्याची जबाबदारी धारावी पोलिसांवर होती. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही समांतर तपास सुरू होता.

मृतदेहाची ओळख पटण्यासाठी धारावी पोलिसांची पथके तयार करण्यात आली. छायाचित्र घेऊन या पथकांनी परिसरात तपासाला आरंभ केला. या परिसरातील विविध थरांतील नागरिकांशी संपर्कात राहता यावे, यासाठी अनेक ‘व्हॉटस्अ‍ॅप’ गट वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत बांगर यांनी तयार केले होते. या गटावरही हे छायाचित्र टाकण्यात आले. परंतु सायंकाळपर्यंत  काहीही सुगावा लागत नव्हता.

धारावीतील ज्या संगम हॉटेलनजीक मृतदेह आढळला तेथे साध्या वेशातील पोलीसही तैनात करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु काहीही माहिती मिळत नव्हती. मृतदेहाची ओळख पटत नसल्यामुळे तपासकामात अडथळा निर्माण झाला होता. अखेरीस सायंकाळच्या सुमारास ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर छायाचित्र पाहून एक व्यक्ती पोलीस ठाण्यात आला. झिया उल हक याचा हा मृतदेह असल्याची माहिती त्याने दिली. झिया हा या पोलीस ठाण्यात आलेल्या व्यक्तीचा मेव्हणा होता. झिया हा मूळचा बिहारचा. त्याचा लहान भाऊ सना हाही काही दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. झिया राहत असलेल्या ठिकाणी पोलीस गेले. घराला कुलूप होते. सनाही गायब झाला होता. त्यामुळे सनाचा या हत्या प्रकरणात सहभाग असावा, असाही पोलिसांचा अंदाज होता. बहुधा सना गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गेला असावा, असा वहीम ठेवून पोलिसांची पथके विविध ठिकाणी गेली. अखेर सनासारखी दिसणारी व्यक्ती कल्याण स्थानकात या पथकाला दिसली. बिहारकडे जाणाऱ्या ‘कामायनी एक्स्प्रेस’ची ही व्यक्ती वाट पाहत होती. ही व्यक्ती सना असल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर लगेचच सनाने भावाच्या हत्येची कबुली दिली. बिहारहून मुंबईला येताना गावठी रिव्हॉल्व्हर सोबत आणले होते आणि त्याचाच वापर करून भावाची हत्या केल्याचे सनाने सांगितले. तोवर पोलिसांच्या पथकाने सनाचा वावर हत्येच्या दिवशी त्या परिसरात असल्याचा तांत्रिक पुरावा गोळा केला होता.

सनाला अटक करण्यात आली. सनाच्या मित्राकडून झियाने दोन मोबाइल फोन घेतले होते. परंतु त्याचे पैसे देण्यास तो टाळाटाळ करीत होता. या व्यवहारात सना जामीनदार होता. वारंवार सांगूनही झिया दाद देत नव्हता. अखेर सना मुंबईत येऊन आणि मित्राचे मोबाइल परत कर वा पैसे दे, असे झियाला सांगत होता. परंतु काहीही ऐकण्यास तयार नसलेल्या  झियाबद्दल संताप न आवरल्याने स्वत:कडील गावठी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. यात झियाचा मृत्यू झाला. त्याची ओळख पटू नये, यासाठी झियाच्या चेहऱ्यावर सनाने रॉकेल ओतले. या वेळी सनासोबत त्याचा मित्रही होता. परंतु तो प्रचंड घाबरला होता. पोलिसांना गुन्हेगार सापडला होता.

केवळ चार तासांत धारावी पोलिसांनी या खुनाची उकल केली होती. मृतदेहाची ओळख पटण्यातही काही दिवस जातात आणि तोवर आरोपी फरार होतात. थोडासा उशीर झाला असता तरी सना बिहारला पळून जाण्यात यशस्वी ठरला असता. मात्र ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील गटामुळे गुन्हेगाराची तत्काळ ओळख पटल्याचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त रावसाहेब शिंदे सांगत होते.

निशांत सरवणकर @ndsarwankar

nishant.sarvankar@expressindia.com