मुंबई पोलीसांच्या कार्यक्षमता व तत्परतेबद्दल सर्वानाच अभिमान आहे. पोलीसांच्या सतर्कतेबद्दलचा आपला अभिमान आणखी वाढेल अशी एक घटना नुकतीच खार परिसरात घडली. सांताक्रुझ विमानतळावर उतरून रिक्षाने घरी येताना रिक्षामध्येच राहिलेली अंधेरी येथील रहिवाशी सोम्यो मित्रा यांची बॅग केवळ खार पोलीसांच्या सतर्कतेमुळे परत मिळाली.
हिंदूस्थान युनिलिव्हर मध्ये काम करणारे सोम्यो मित्रा हे १३ मार्चला दिल्लीवरून विमानाने रात्री उशिरा मुंबई विमानतळावर उतरले. त्यानंतर विमानतळावरून ते रिक्षाने घरी गेले. मात्र घरी पोहोचल्यावर बॅग रिक्षातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु, बाहेर येईपर्यंत रिक्षा निघून गेली होती. त्यानंतर बॅग मिळविण्यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले. वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली. परंतु, ही तक्रार दाखल करण्याच्याही आधी बॅग राहिलेली रिक्षा मात्र खापर्यंत पोहचलीही होती.
रात्री एक वाजता स्वामी विवेकानंद मार्ग परिसरात ही रिक्षा पोहचल्यावर तेथे पेट्रोलिंग करत असलेले खार पोलीस स्टेशनमधील हवालदा किरण गुजर व रत्नाकर पाटील यांची नजर त्या रिक्षावर गेली. रिक्षामध्ये प्रवासी कोणीच नाही परंतु, त्यात मागे फक्त बॅग ठेवलेली असल्याने त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी त्वरीत रिक्षा थांबवून चालकाकडे चौकशी केली. तेव्हाच चालकालाही सुटकेस राहिल्याचे लक्षात आले. मग हवालदार गुजर व पाटील यांनी ती बॅग ताब्यात घेऊन खार व वर्सोवा येथील पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. परंतु, बॅग हरवल्याची तक्रार वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली नसल्याचे त्यांना कळाले.
शेवटी बॅग त्यांनी खार पोलीस स्टेशनमध्ये जमा केली. त्यानंतर काही वेळाने मित्रा यांनी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना त्यांची बॅग पोलीसांच्या ताब्यात असल्याचे कळताच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.