पोलिसांचा खबरी असल्याचे सांगत एका व्यावसायिकाला जबर मारहाण करत त्याच्याकडून रोख रक्कम लुटल्याची घटना चार दिवसांपूर्वी गोवंडीच्या शिवाजी नगर येथे घडली आहे. शिवाजी नगर पोलिसांकडे या व्यावसायिकाने तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलीस त्याच्यावर काहीही कारवाई करत नसल्याने व्यावसायिकाने याबाबत अप्पर पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

विनोदकुमार चौरसिया असे या व्यावसायिकाचे नाव असून त्यांचा गोवंडी येथे विविध कंपन्यांचे बिस्कीट होलसेल दरात विकण्याचा व्यवसाय आहे.

शुक्रवारी सायंकाळी ५च्या सुमारास चौरसिया त्यांच्या दुकानात असताना साधू नामक व्यक्ती आली. पोलिसांचे खबरी असल्याचे सांगत त्याने चौरसिया यांच्याकडे महिना २५ हजार रुपये खंडणीची मागणी केली. मात्र चौरसिया यांनी याला विरोध केला असता त्याने चौरसिया याच्यासह काही कर्मचाऱ्यांना मारहाण करीत दुकानातून १० हजारांची रक्कम आणि चौरसिया यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला.

चौरसिया यांनी तात्काळ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली घटना पोलिसांना सांगितली. मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करत चौरसिया यांना घरी जाण्यास सांगितले.

चौरसिया यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या कानावर हे प्रकरण घातले. त्यानुसार या साधू नामक इसमाला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले.

मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील तो पोलिसांचा खबऱ्या असल्याने त्याला केवळ समज देऊन सोडून दिले.

पोलीस अन्याय करत असल्याने न्याय मिळावा यासाठी चौरसिया यांनी पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त लखमी गौतम आणि परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उपम यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. यात त्यांनी साधूसह त्याच्यावर कारवाई टाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.