केंद्रीय गृहमंत्रालयाचे पोलीस ठाण्यांना फर्मान

देशात नोटाबंदीची उद्दिष्टय़े साध्य करण्यासाठी आता पोलिसांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. रोकडरहित व्यवहार हे नोटाबंदीचे एक उद्दिष्ट होते. त्या ध्येयपूर्तीसाठी नागरिकांना रोकडरहित व्यवहार करण्यास प्रवृत्त करणे, तसेच बनावट नोटांचा प्रसार रोखणे यासाठी काय प्रयत्न केले याचा अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्व पोलिसांना दिले आहेत.

हैदराबाद येथे गतवर्षी २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात या अनुषंगाने चर्चा झाली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झाल्याचे केवळ अहवाल पोलिसांनी सादर केल्याचे असल्याचे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. त्यानंतर या संदर्भात नेमकी काय अंमलबजावणी झाली हे कळवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने सर्व पोलीस अधीक्षक व आयुक्तांना दिले आहेत. तशा आशयाचे पत्र सर्व पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांना याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.