पोलिसांच्या गाडीने धडक दिल्याने २१ वर्षीय तरुणी ठार झाली, तर तिचा भाऊ जखमी झाला. अंधेरीत रविवारी रात्री ही दुर्घटना घडली, परंतु या तरुणीची स्कूटी दुभाजकाला धडक देत पलीकडील रस्त्यावर असलेल्या पोलिसांच्या गाडीखाली आल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अपघाताबाबत सहायक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी सांगितले की, विलेपार्ले येथे राहणारी अवनी देसाई (२१) ही तरुणी स्कूटीवरून आपल्या लहान भावासह घरी जात होती. शहाजी राजे रोडजवळ तिचे स्कूटीवरील नियंत्रण सुटले आणि तिने दुभाजकाला धडक दिली. या धडकेमुळे ती पलीकडील रस्त्यावर फेकली गेली. त्याच वेळी खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवधूत चव्हाण यांची क्वालिस गाडी तेथून अंधेरीच्या दिशेने जात होती. दुभाजकाला धडकलेली अवनीची स्कूटी या पोलिसांच्या गाडीखाली आली आणि हा अपघात झाला. या दोघांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवधूत चव्हाण यांनी सांगितले की, मी रात्री माझ्या घरी अंधेरीच्या दिशेने जात होतो. आमच्या विरुद्ध दिशेला ही तरुणी विलेपार्लेच्या दिशेने जात होती. दुभाजकाला धडक लागून तिची गाडी आमच्या वाटेत फेकली गेली. हा अपघात पोलिसांच्या गाडीमुळे झालेला नाही. तिला आम्ही त्वरित रुग्णालयात नेले, पण दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. चालक भोसले याच्यावर निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अवनीच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तिचा नेमका मृत्यू कशामुळे झाला ते स्पष्ट होईल आणि त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल, असे सहायक पोलीस आयुक्त ढोबळे यांनी स्पष्ट केले. चालक भोसले याने मद्यपान केले नसल्याचेही वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे.