संदीप आचार्य

मुंबई-पुण्यासह राज्यात करोना रुग्णांसाठी पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णवाहिकांकडून लुटमार सुरू आहे. याची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने एका आदेशाद्वारे राज्यातील खासगी रुग्णवाहिका करोना रुग्णांसाठी आवश्यकतेनुसार ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई पालिकेने बेस्ट आणि काही एसटी बसचे रुग्णवाहिकेत परिवर्तन केले. मात्र त्याही अपुऱ्या पडू लागल्याने काही प्रमाणात खासगी रुग्णवाहिकांवर रुग्णांना अवलंबून राहावे लागत आहे. याचा फायदा घेत किरकोळ अंतरासाठीही तीन ते १५ हजार रुपयांची मागणी होऊ लगली आहे. याबाबतच्या तक्रारींची दखल घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे राज्यातील खासगी रुग्णवाहिका आणि वाहाने आवश्यकतेनुसार ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व रुग्णवाहिकांची संलग्नता १०८ क्रमांकाच्या यंत्रणेबरोबर केली जाणार आहे. जीपीएसच्या माध्यमातून या गाडय़ांचे नियंत्रण जिल्हाधिकारी व पालिका स्तरावर केले जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

भाडे निश्चिती.. : खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेताना प्रति किलोमीटर, तसेच अन्य खर्चाचा विचार करून भाडे निश्चित केले जाईल. पालिका क्षेत्रात आयुक्त आणि अन्यत्र जिल्हाधिकाऱ्यांनी या रुग्णवाहिका आवश्यकतेनुसार ताब्यात घ्यायच्या आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडे राज्यातील सर्व रुग्णवाहिकांची नोंद असून त्यानुसार रुग्णवाहिका ताब्यात घेण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.