करोना संसर्गाचा उद्रेक लस निर्मिती होईपर्यत वारंवार होण्याचा अंदाज लंडनच्या इम्पेरिएल महाविद्यालयाच्या कोविड—१९ रिस्पॉन्स टीमच्या संशोधनात्मक अभ्यासातून व्यक्त केला आहे.
देशातील आर्थिक आणि आरोग्य परिस्थितीनुसार थोडय़ा थोडय़ा काळाने वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त संसर्ग रोखण्याच्या उपायांवर भर देणे गरजेचे असल्याचेही या अभ्यासाने अधोरेखित केले आहे.
इम्पॅक्ट ऑफ नॉल फार्मासिटय़ुकल इंटरनव्हेन्शन टू रिडय़ूस कोविड १० मॉटर्य़ालिटी अण्ड हेल्थकेअर डिमांड नावाने हा अभ्यास १६ मार्चला प्रसिद्ध झाला आहे.
या अभ्यासानुसार, संचारबंदी किंवा नियंत्रण कमी केल्यास करोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे. यावरील प्रतिबंधात्मक लस निर्मिती होईपर्यत हे चक्र सुरूच राहील. लस निर्मिती होऊन मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी किमान १८ महिने किंवा त्याहीपेक्षा अधिक काळ लागू शकतो असा अंदाज या अभ्यासात व्यक्त केला आहे.
करोना संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त दोन प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय या अभ्यासात सूचित केले आहेत.
जोखमीच्या गटातील व्यक्तींपासून सामाजिक दुरावा, रुग्ण, संशयित यांच्यावरील संचारबंदी या उपाययोजना केल्यास आरोग्य यंत्रणेवरील संभाव्य दोन तृतीयांश भार कमी होईल. तसेच अर्धे मृत्यू रोखणे शक्य होईल. मात्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्ग प्रसार रोखण्यासाठी देशभरात सामाजिक दुरावा पाळणे, स्वयंअलगीकरण, ७० वर्षांवरील व्यक्तींपासून सामाजिक दुरावा राखणे, शाळा—महाविद्यालये बंद करणे आणि वैयक्तिक वर्तनामध्ये बदल करणे अत्यावश्यक असल्याचे अमेरिका आणि ब्रिटनमधील आकडेवारींचे दाखले देत या अभ्यासातून स्पष्ट केले आहे.