भारतीय डाक विभागातर्फे माय स्टँप योजनेंतर्गत एक नवीन स्टँप बनविण्यात आला आहे. मुंबईकतील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिराला हा मान मिळाला आहे. केवळ मुंबईतीलच नाही तर देशातील भक्तांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या देवस्थानाला अशाप्रकारे मान मिळणे ही अतिशय आनंदाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्टँपचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले. मंदिराच्या गाभाऱ्यात झालेल्या या प्रकाशनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंदिर न्यासाचे आदेश बांदेकर, कोशाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त एन.जे.जमादार आणि महाराष्ट्र सर्कलचे पोस्टमास्टर जनरल हरिशचंद्र अग्रवाल उपस्थित होते.

या योजनेंतर्गत सिद्धिविनायक भक्तांनाही अनोखी संधी मिळणार आहे. या स्टँपवर भक्तांना आपला, आपल्या परिवाराचा, मित्रमंडळींचा आणि नातेवाईकांचा फोटो देऊन त्याचाही विशेष स्टँप बनविता येणार आहे. यामध्ये अर्ध्या भागात मंदिराचे छायाचित्र आणि अर्ध्या भागात आपण दिलेला फोटो असेल. आज भारतभर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढीविरोधात विरोधी पक्षांनी बंद पुकारला आहे. त्याचे पडसाद या कार्यक्रमादरम्यानही पाहायला मिळाले. मुख्यमंत्री या स्टँपच्या प्रकाशनाच्यावेळी उपस्थित असताना त्यांच्याविरोधात मंदिराबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली.