कोळसा खाणींमधील कामगार संघटनांचा संप सुरू होत असताना राज्यातील सात औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये सरासरी जेमतेम पाच दिवस पुरेल इतकाच कोळसा आहे. नाशिकचा वीजप्रकल्प वगळता कोराडी, पारस, खापरखेडा, चंद्रपूर, परळी, भुसावळ या सहा वीजप्रकल्पांत चार दिवसांचा कोळसासाठा आहे. त्यामुळे आठवडाभर कशीबशी वीज मागणी पूर्ण होणार आहे.
‘महानिर्मिती’कडून सध्या ४७०० मेगावॉट विजेचा पुरवठा राज्याला होत आहे. नाशिक वीजप्रकल्पात १५ दिवस पुरेल इतका कोळसा आहे, तर बाकी सर्व वीजप्रकल्पांत चार दिवस पुरेल इतका कोळसा उरला आहे. अर्थात जवळपास ३५ ते ४० गाडय़ा महाराष्ट्राच्या वीजप्रकल्पांसाठी कोळसा घेऊन निघाल्या आहेत. तो कोळसा दोन-चार दिवसांत उपलब्ध होईल. त्यामुळे कोळसा खाण कामगारांचा संप असला तरी सरासरी ४७०० मेगावॉट वीजनिर्मिती पाच ते सहा दिवस करण्यात अडचण येणार नाही, असे ‘महानिर्मिती’मधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.