प्रकाश आंबेडकर यांचा भाजप सरकारवर आरोप

ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या नेत्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध जोडला जात आहे, तसेच विषमतावादी विचारांच्या विरोधात लढणारे राजकीय नेतृत्व संपविण्याचा भाजप सरकारचा डाव आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. एल्गार परिषदेतील नेत्यांचा माओवाद्यांशी ओढून-ताणून संबंध जोडून भीमा-कोरेगाव दंगलीतील आरोपी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना वाचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

१ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील हिंसाचारप्रकरणी पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेतील काही नेत्यांना जबाबदार धरण्यात आले. या परिषदेला माओवाद्यांची फूस होती, तसेच त्यांनी त्यासाठी पैसाही पुरविला, असा पोलिसांचा कयास आहे. या संदर्भात माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईत सापडलेल्या पत्रात प्रकाश आंबेडकर यांचाही उल्लेख असल्याचे, परंतु त्याचा खरेखोटेपणा तपासला जात असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्या पत्रातील उल्लेख केवळ प्रकाश असा आहे आणि त्या नावाची व्यक्ती गुवाहाटीमधील आहे, आपला त्याच्याशी  संबंध नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले.

पंतप्रधानांची सुरक्षा वाढवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याच्या धमक्या आल्या असतील तर त्यांचे संरक्षण वाढवायला हवे. पंतप्रधानांविरोधातील कटाचा गंभीरपणे तपास केला पाहिजे, परंतु पंतप्रधानविरोधी कटाचे प्रकरण शासकीय यंत्रणांकडून इतक्या थिल्लरपणे कधीच हाताळले गेले नव्हते, याकडे प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधले.