गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले. ते शुक्रवारी विधानसभेत बोलत होते. यावेळी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी होईल, असे सांगितले. मात्र, प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरूवात केली. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमक अवतार धारण केला. तत्त्वांना तडजोड करण्याची ज्यावेळी वेळ येईल, तेव्हा सरकारला लाथ मारून बाहेर जाईल, माझ्या निष्ठेवर शंका घेऊ नका, असे प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिले. घोटाळ्याची चौकशी ही कोणत्याही सरकारी यंत्रणेमार्फत होणार नाही. तर ती निष्पक्षपातीपणे होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

समतानगर पुनर्विकास प्रकल्पावर मेहतांची कृपादृष्टी?

ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाऊडमधील एस. डी. कॉर्पोरेशन राबवीत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विकासकाला अनुकूल भूमिका घेतल्यामुळे प्रकाश मेहता अडचणीत आले होते. त्यानंतर कांदिवली पूर्व येथील समतानगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित फाइल मंत्री झाल्यानंतर निकालात काढल्याचे आणखी एक प्रकरण समोर आल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली होती. तर उद्योगासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीपैकी तब्बल ३१ हजार एकर जमीन भूसंपादनातून वगळल्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी २० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता.

‘देसाई यांचा घोटाळा २० हजार कोटींचा’