29 May 2020

News Flash

प्रकाश मेहता, सुभाष देशमुख यांच्यावर संघ, तर सुभाष देसाईंवर उद्धव ठाकरे नाराज

लवकरच या मंत्र्यांवर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते नाराज असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती नाराजी कळविली आहे. ‘वैयक्तिक’ लाभापेक्षा पक्षहित मोठे, या न्यायाने शिवसेनेला मदत करण्याकडे दुर्लक्ष केल्याने उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही नाराज आहेत. त्यामुळे लवकरच या मंत्र्यांवर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

ताडदेव येथील एम पी मिल झोपु प्रकल्पासह मेहता यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक प्रकरणांमध्ये आरोप झाले. एमपी मिल प्रकल्पासह काही प्रकरणे लोकायुक्तांकडे चौकशीसाठी सोपविली जाणार आहेत. तर सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूह व अन्य बाबींमध्ये बऱ्याच तक्रारी असून शेतकऱ्यांना पत्ताही नसताना त्यांच्या नावाने कर्जे उचलण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे भ्रष्टाचारविरोधात लढण्याचे आवाहन नागरिकांना करीत आहेत. मात्र या मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना फडणवीस हे त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने जनमानसात चुकीचा संदेश जात आहे व त्यांच्या प्रतिमेवरही परिणाम होत आहे. विरोधी पक्षात असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर व चौकशीची मागणी केल्यावर मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी करण्यात आली आणि काही वेळा ते घेतलेही गेले. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचाही राजीनामा चौकशीआधी घेण्यात आला. तोच न्याय या मंत्र्यांनाही लावावा, असे मत संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे समजते.

मात्र मेहता यांचे पंतप्रधान मोदी व अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत. तर सुभाष देशमुख यांचेही ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी निकटचे संबंध आहेत. त्याचबरोबर ज्या प्रकरणांमध्ये आरोप झाले, त्या प्रकरणांमध्ये काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सूचना आल्या होत्या. त्यामुळे या मंत्र्यांचा दोष किती व त्यांनी कोणाच्या आदेशावरुन पावले टाकली, या बाबी अजून गुलदस्त्यात आहेत. याचा विचार करता मंत्र्यांवर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांपुढे पेच आहे. मात्र मेहता, देसाईंवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांकडून लवकरच पावले टाकली जातील, असे समजते. त्यामुळे मेहता यांनी १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री नात्याने ध्वजवंदन समारंभाला रायगडला जाणे टाळले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

नाराजीचे कारण..

पक्ष सत्तेवर असताना मंत्र्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची कामे करावीत आणि पक्षबांधणीसाठी मदत करावी, असे शिवसेना नेतृत्वाला मंत्र्यांकडून अपेक्षित होते. निवडणुका लढविण्यासाठीही ज्या बाबींची ‘गरज’ असते, त्याला मंत्र्यांकडून ‘हातभार’ लावणे आवश्यक असते. पण शिवसेनेच्या मंत्र्यांकडून कार्यकर्ते व आमदारांची कामे होत नाहीत आणि मदतही केली जात नाही, अशा तक्रारी गेले काही महिने सातत्याने ठाकरे यांच्याकडे करण्यात येत आहेत. त्यांनी काही मंत्र्यांना कानपिचक्याही दिल्या. मंत्र्यांनी वैयक्तिक लाभापेक्षा ‘पक्ष लाभाकडे’ अधिक ‘भर’ दिला पाहिजे, असे अपेक्षित असल्याची कल्पनाही पक्षनेतृत्वाने दिल्याचे समजते. त्यामुळे देसाई हे आता आपल्या पक्षनेतृत्वाची नाराजी दूर करण्यासाठी कामकाज पध्दतीमध्ये बदल करुन पक्षासाठी अधिक (वेळ) ‘खर्च’ करण्यास तयार झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र मेहता यांच्यावर कारवाईचा निर्णय भाजपने घेतल्यास देसाई यांच्यावरही ती करण्यात येणार असून ठाकरे यांनी त्यासाठी सहमती दर्शविली असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 12:53 am

Web Title: prakash mehta subhash desai rss uddhav thackeray
Next Stories
1 कर्जमाफीसाठी १२ लाख ३८ हजार शेतकऱ्यांची नोंदणी; सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती
2 रेल्वे बुकिंग क्लार्कचा प्रताप, प्रवाशांच्या अकाऊंटमधून काढले १.३३ लाख रूपये
3 मुख्यमंत्र्यांचा ‘सप्तमुक्ती’संकल्प
Just Now!
X