बलात्काराच्या आरोपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांना अटकेपासून सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत त्यांची अटक टळली आहे. दरम्यान, आपल्याविरोधात सूडच्या भावनेतून गुन्हा नोंदविण्यात आल्याचा आरोप पारसकर यांच्याकडून सुनावणीच्या वेळेस करण्यात आला.
एका मॉडेलच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर अटक होण्याच्या भीतीने पारसकर यांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात धाव घेतली. या वेळी ३१ जुलैपर्यंत यांना अटक न करण्याचे आदेश देत त्याच दिवशी पारसकर यांच्या अटकपूर्व जामीनवर सुनावणी ठेवण्यात आली़ पोलिसांना सुनावणीच्या वेळीच त्यांचे म्हणणे मांडण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
संबंधित मॉडेलने विविध सोशल नेटवर्किंग साइटवरून पारसकर यांना ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठवल्या होत्या. शिवाय तिने पारसकर यांना अन्य एका मॉडेलविरोधात गुन्हा दाखल करण्यासही सांगितले होते. परंतु त्यांनी त्यास नकार दिल्याचेही कारण तिने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यामागे असल्याचा दावा पारसकरांच्या वतीने अॅड्. रिझवान र्मचट यांनी केला. तसेच पारसकर यांना अटक करण्यात आली तर पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होऊन यापुढे तपास करण्याबाबत अधिकारी टाळाटाळ करतील, असेही र्मचट यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.
त्यावर न्यायालयाने पारसकर आणि संबंधित मॉडेल मित्र होते का, असा सवाल केला. त्यावर र्मचट यांनी होकारार्थी उत्तर देत दोघे मॉल्स आणि कॉफी शॉपमध्ये एकत्र जात होते, अशी माहिती न्यायालयाला दिली. पारसकर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणार नसल्याची हमीही त्यांनी दिली. हे पूर्ण प्रकरण दोघांनी एकमेकांना मोबाईल आणि ई-मेलवरून पाठवलेल्या संदेशावर आधारित आहे. हा सगळा पुरावा संबंधित कंपन्यांकडून मागविण्यात आलेला आहे. तसेच पारसकर स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याने ते फरारी होण्याची शक्यता नाही. गुन्हा नोंदविण्यात आला त्या वेळेसही ते आपल्या कार्यालयात होते, ही बाबही र्मचट यांनी सांगितली. त्यांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला नाही. त्यांना उत्तम कामगिरीसाठी गौरविण्यात आलेले आहे, असाही दावा त्यांनी केला.
तपासासाठी विशेष पथके
या गुन्ह्यचा तपास करण्यासाठी महिला अत्याचारविरोधी कक्षाने विशेष पथक तयार केले आहे. त्यात एक सायबर सेल तज्ज्ञ, मोबाईलचे सीडीआर तपासण्याचा अनुभव असणाऱ्या तज्ज्ञाचाही समावेश आहे. अन्य अधिकाऱ्यांची मागणीही कक्षातर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी आयुक्तांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची परवानगी घेण्यात आली होती.
जबाब नोंदविले
शुक्रवारी घटनास्थळाचा पंचनामा करून काही जबाब नोंदविण्यात आले. पारसकर यांनी मालवणी येथील एक खासगी बंगला तसेच एका फ्लॅटमध्ये बलात्कार तसेच वाशी येथील एका फ्लॅटमध्ये विनयभंग केल्याचे या मॉडेलने तक्रारीत म्हटलेआहे. न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे या मॉडेलचा जबाब नोंदविला जाणार असल्याची माहिती महिला अत्याचारविरोधी कक्षाच्या पोलीस उपायुक्त शारदा राऊत यांनी दिली. विधितज्ज्ञांची मते घेतल्यानंतर पारसकर
यांच्यावर आणखी कलमे दाखल केली जातील, असेही त्या म्हणाल्या.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2014 रोजी प्रकाशित
पारसकर यांना ३१ जुलैपर्यंत दिलासा
बलात्काराच्या आरोपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांना अटकेपासून सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला.
First published on: 26-07-2014 at 06:06 IST
TOPICSसुनील पारसकर
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pre arrest bail to ips officer sunil paraskar in model rape case