वसईत पावसाचा कहर आहे, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी गेले होते. हे अधिकारी परतत असताना हॉटेल ग्रीन या ठिकाणी एका गरोदर महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. या महिलेला हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक असल्याने अग्निशमन दलाने होडीच्या मदतीने तिला रूग्णालयात पोहचवले. आता या महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आशा जीवन डिसूजा असे या महिलेचे नाव आहे. ही महिला वसई येथील शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या मथुरा इमारतीत राहते.

वसई आणि विरार भागात मुसळदार पाऊस पडत असल्याने वाहने, पालिकेची परिवहन सेवा आणि रिक्षाही बंद झाल्या आहेत. अशात या अशा डिसूजा यांना प्रसूतीकळा सुरू झाल्याने त्यांना होडीतून रूग्णालयात नेऊन दाखल करण्यात आले. वसई विरार महापालिकेच्य अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने निर्णय घेऊन आशा डिसूजा यांना होडीने रूग्णालयात दाखल केले. आशा डिसूजा यांना शंभर फुटी रोडवर बोटीत बसवण्यात आले आणि रूग्णालयात नेण्यात आले अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. त्यांच्या या निर्णयाचे सगळ्यांनीच कौतुक केले आहे.

विरार आणि वसई भागात गेल्या ४ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने बोरिवली ती विरार ही पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. वसईच्या सनसिटी भागातही पाणी साठले आहे. या ठिकाणीही काही लोकांनी होडी आणून प्रवास केल्याची माहिती मिळते आहे. ज्या भागात ३० वर्षात कधीही पाणी साठले नाही अशाही भागात पाणी साठल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

दरम्यान माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत गणपती मंदिराच्या बाजूला असणाऱ्या गार्डनमध्ये काम करणारे १० लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस यांनी त्या सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढले आहे.आसाराम कोळेकर, सुमन कोळेकर, विनोद जगताप आणि त्यांची पत्नी, कैलास आणि इतर लहान मुले या सगळ्यांना सोडवले आहे. काही वेळासाठी पाऊस विश्रांती घेतो आणि पुन्हा कोसळू लागतो त्यामुळे साठलेले पाणी ओसरू सकलेले नाही.