माजी मुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन काँग्रेसने आता सरकारच्या विरोधात वातावरण तापविण्यावर भर दिला आहे. तसेच मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता पक्षाचे तीन माजी मुख्यमंत्री व काही नेते या भागाचा दौरा करणार आहेत.
गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याने काँग्रेसमध्ये आलेले नैराश्य दूर होऊ लागले आहे.भाजप सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय पक्षाच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा तसेच सरकारच्या नातर्केपणावर बोट ठेवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि नारायण राणे हे तीन माजी मुख्यमंत्री यांच्यासह राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे, डॉ. पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आदी नेते ५ ते ७ मे या काळात मराठवाडय़ातील जिल्हय़ांना भेटी देणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.