लोकलसेवा उपलब्ध नसल्याने खासगी नोकरदारांची कोंडी; कामावर हजर न राहिल्यास वेतनकपातीचे संकट

मुंबई : मुंबई सार्वत्रिक टाळेबंदीच्या व्याधीपासून दूर असली तरी उपनगरीय रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेकरींकरता वापरण्याच्या निर्णयामुळे मुंबईतील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लाखो उपनगरीय प्रवाशांना बेस्ट, एसटी, अ‍ॅपवर चालणाऱ्या टॅक्सींचा वेळखाऊ व खर्चीक मार्ग अनुसरत दररोज घर-कार्यालय-घर असा प्रवास करावा लागत आहे. जास्त पदरमोड किंवा धावपळ करून कामावर पोहोचणे या नोकरदारांसाठी कठीण बनले असून अनेक ठिकाणी कामावर न येऊ शकणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनकपातीला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाली असून या घुसमटीतूनच बुधवारी नालासोपाऱ्यात प्रवाशांचा उद्रेक पाहायला मिळाला.

मुंबई महानगरक्षेत्राचा विस्तार डहाणू, कर्जत, कसारा, पनवेल या शहरांपर्यंत झाला असून येथून मुंबई-ठाण्यात कामासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या लोकसंख्येच्या प्रवासाचा भार प्रामुख्याने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेवर असून एरवी तब्बल ८० लाख प्रवासी दररोज लोकलने प्रवास करतात. मात्र, टाळेबंदीनंतर सुरू झालेल्या लोकल सेवेचा लाभ सध्या केवळ दोन ते अडीच लाख प्रवाशांनाच मिळत आहे. अत्यावश्यक सेवा, सरकारी कार्यालयांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे. खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना मात्र, रस्तेमार्गे कामाचे ठिकाण गाठावे लागत आहे. कर्जत, पनवेल, डहाणू अशा लांबच्या शहरांतून मुंबईत कामासाठी येणाऱ्यांना रस्तेवाहतूक खर्चीक ठरत आहे. मात्र, कार्यालयांत हजर न राहिल्यास वेतनकपात किंवा बडतर्फीची भीती असल्याने या नोकरदारांना जास्त खर्च करून वेळखाऊ प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे खासगी नोकरदारांसाठीही लोकलसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मध्य रेल्वेचे प्रवासीही अस्वस्थ

ठाणे : पश्मिच रेल्वे मार्गावरील नालासोपारा येथे बुधवारी नोकरदार वर्गाने केलेल्या रेल रोको आंदोलनाचे पडसाद मध्य रेल्वे मार्गावरही उमटण्याची शक्यता आहे.  ‘पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेच्या प्रवाशांमध्येही खदखद असून खासगी नोकरदारांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत निर्णय न झाल्यास नालासोपाऱ्याप्रमाणे मध्य रेल्वे मार्गावरही आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिला.

एसटी, बेस्टवर प्रवाशांचा भार

सध्याच्या घडीला खासगी सेवेतील प्रवाशांचा सर्व भार एसटी आणि बेस्टवरच आहे. लोकल नसल्याने ठाणे, कल्याण,डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, कर्जत, पनवेल, वाशी, वसई, विरार येथून मुंबईच्या दिशेने एसटी व बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील अनेक जण एसटीने मुंबईच्या वेशीपर्यंत येतात आणि बेस्टने मुंबईतील कार्यालय गाठतात. तीच परिस्थिती पुन्हा घरी जातानाही असते. सध्या बेस्ट उपक्र माच्या ३,५०० पैकी ३,२२४ बस धावत आहेत. या गाडय़ांमधून दररोज सुमारे ११,७२,६०० प्रवाशी प्रवास करतात. ८ जूनला ही संख्या चार लाखांच्या आसपास होती. तर एसटीच्या दररोज ६०० बस फे ऱ्या होतात. यामधून दररोज १३,६०० प्रवासी प्रवास करतात.

सामान्यांचा कोंडमारा

मालवणीला राहाणारे लोके ंद्र परिहार शेअरबाजारात काम करतात. ट्रेनने अवघ्या ४० मिनिटांत त्यांना अंधेरीच्या कार्यालयात पोहोचता येते. मात्र सध्या रिक्षाने प्रवास करावा लागतो. दररोज ४०० रुपये प्रवासखर्च आणि तीन तास वेळ वाया घालवावा लागत आहे.

****

खार येथील सलूनमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करणाऱ्या आरती ठक्कर मीरा रोड ते खार अशा रोज प्रवास करतात. प्रवासासाठी दररोजचे ७०० ते ८०० रुपये खर्च येतो. यातून बराचसा पगार प्रवास भाडय़ातच जातो, असे त्या सांगतात.

****

बदलापूरला राहणाऱ्या आणि सीएसटीजवळ एका सहकारी बँके त कामाला असलेल्या शुभदा जोशी यांना लोकलने प्रवासाची मुभा नसल्याने खासगी गाडी किं वा बसविशाय दुसरा पर्याय नाही. एकीकडे राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलप्रवासाची परवानगी असताना सहकारी बँकेचे कर्मचारी मात्र, वंचित आहेत.

****

डोंबिवलीहून मुलुंडला जाणारे उदय वाडेकर यांच्यासाठी दोन रिक्षा आणि बस असा प्रवास रोज करावा लागत आहे. यासाठी दररोज दोनशे रुपये त्यांना मोजावे लागत आहेत.

****

टिटवाळा येथे राहणारे चेतन गणेशकर हे भायखळा येथील एका खासगी कंपनीत कामाला असून दररोज बस किंवा खासगी वाहनाने कामावर जाण्यासाठी १५० ते २०० रुपये खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातच कंपनीने पगारात कपात केल्यामुळे हा खर्च आता परवडत नसून सरकारने रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.