मध्य रेल्वेमार्गावर शुक्रवारी दिवा स्थानकात रेल्वेच्या मालमत्तेची नासधुस करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत. शुक्रवारी सकाळी ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल सहा तास ठप्प झाली होती. गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे दैनंदिन कामासाठी आणि कार्यालये गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. गाड्या वेळेवर धावत नसल्याने आणि प्रवाशांना याबाबत रेल्वेकडून काहीच माहिती मिळत नसल्याने संतप्त प्रवाशांनी दिवा स्थानकात रेल रोको केला. संतप्त जमावातर्फे पोलीस व्हॅन पेटवण्यात आली आणि पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. तसेच तीन खासगी गाड्या जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे कळते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही प्रवाशांवर लाठीचार्ज करावा लागला. जमावाने स्थानकातील एटीव्हीएम मशिन्स, तिकीट खिडक्या व अन्य सामानाची तोडफोड केली. याशिवाय, दिवसभरात विविध ठिकाणी झालेल्या रेलविरोधी आंदोलनात १० गाड्यांचे नुकसान झाले.