06 March 2021

News Flash

वाहनतळ व्यवस्थेसाठी पालिकेची सोसायटय़ांना साद!

दिवसभर मोकळी राहणारी रहिवासी संकुलांची जागा वाहनतळ म्हणून वापरण्यासाठी चाचपणी सुरू

|| प्रसाद रावकर

दिवसभर मोकळी राहणारी रहिवासी संकुलांची जागा वाहनतळ म्हणून वापरण्यासाठी चाचपणी सुरू

वाहन संख्येत झालेली प्रचंड वाढ आणि मर्यादित जागा लक्षात घेता मुंबईत मोठय़ा संख्येने सार्वजनिक वाहनतळ उपलब्ध करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे आता दिवसभर मोकळी राहणारी सोसायटय़ांच्या आवारातील वाहनतळ मुंबईकरांसाठी खुले करण्याबाबत पालिकेने चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी पालिकेने सोसायटय़ांना साद घालण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. आसपासच्या शहरांमधील नागरिक कामानिमित्त आपले वाहन घेऊन मुंबईत येतात. मुंबईकरांना, तसेच मुंबईबाहेरून येणाऱ्यांना आपली वाहने उभी करता यावी यासाठी पालिकेने ठिकठिकाणी सार्वजनिक वाहनतळ उपलब्ध केले. मात्र वाहनांची संख्या लक्षात घेता वाहनतळ अपुरे पडू लागले आहेत. मुंबईतील अपुऱ्या जागेमुळे वाहनतळांचे नियोजन करण्यात पालिका सपशेल अपयशी ठरली आहे. परिणामी, मुंबईत अनेक ठिकाणी वाहने अस्ताव्यस्त उभी करण्यात येत असून त्याचा पादचारी आणि वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. जागेअभावी शहरात सार्वजनिक वाहनतळ उभे करता येत नसल्यामुळे पालिकेने आता सोसायटय़ांच्या आवारातील जागा सार्वजनिक वाहतळांसाठी मिळू शकते का याची चाचपणी सुरू केली आहे. सोसायटय़ांच्या आवारात वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था असते. या जागेत इमारतीमधील रहिवासी आपली वाहने उभी करतात. मात्र रहिवासी दिवसा आपली वाहने घेऊन कामानिमित्त अन्यत्र जातात. त्या वेळी सोसायटय़ांच्या आवारातील ही जागा मोकळीच असते. सोसायटय़ांमधील ही जागा दिवसा मुंबईकरांना आपली वाहने उभी करण्यासाठी उपलब्ध करता येईल का याबाबत पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. ही जागा उपलब्ध झाल्यास त्या परिसरात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना आपले वाहन तेथे उभे करता येऊ शकले, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अ‍ॅपवर सार्वजनिक वाहनतळांची माहिती : सार्वजनिक वाहनतळांचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने वाहनतळ प्राधिकरणाची स्थापना केली असून सार्वजनिक वाहनतळांसाठी स्वतंत्र अ‍ॅप बनविण्याच्या हालचाली प्राधिकरणाने सुरू केल्या आहेत. या अ‍ॅपवर सार्वजनिक वाहनतळांची माहिती उपलब्ध करण्यात येणार आहे. एखाद्या विभागात पोहोचण्यापूर्वी तेथे नेमक्या कोणत्या वाहनतळात जागा उपलब्ध आहे याची माहिती वाहनचालकांना अ‍ॅपवर मिळू शकेल. अ‍ॅपवरच वाहनासाठी जागा आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सोसायटय़ांमध्ये जागा उपलब्ध झाल्यास त्यांचाही समावेश अ‍ॅपमध्ये करण्यात येणार आहे.

मुंबईकरांची वाहने तात्पुरती उभी करण्यासाठी सोसायटय़ांकडून जागा मिळते का यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. येत्या १५ दिवसांत ते पूर्ण होईल. त्यानंतर वाहनतळांची नवी यादी तयार करण्यात येईल.   – अजोय मेहता, आयुक्त, बृहन्मुंबई महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 12:30 am

Web Title: problem of parking in mumbai
Next Stories
1 कांची महास्वामी हे माणसाच्या आंतरिक प्रेरणेचे उदाहरण
2 सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्यास १५ हजारांपर्यंत दंड
3 ‘कॅस’साठी प्राध्यापकांकडून बेकायदा शुल्क वसुली
Just Now!
X