नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांबरोबरच मुंबई शहरात उच्च शिक्षणासाठी आलेले आणि वसतिगृहात राहणारे देशी-परदेशी विद्यार्थीही भरडले आहेत.

फोर्ट येथील सेंट जॉर्ज दंत महाविद्यालयात प्रथम वर्गात शिकणारा नाशिकचा सुरज मोये म्हणाला, ‘नोटाबंदीमुळे मला खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. एटीएमही बंद आहेत. घरीसुद्धा पैशाची हीच अडचण असल्याने तेही पसे पाठवू शकत नाहीत. त्यामुळे मला आता मित्रांची मदत घ्यावी लागते आहे.’ याच महाविद्यालयात शिकणारा धनेश नायक म्हणाला, ‘मी सध्या मित्रांकडून उसने पसे घेतो आहे. कॉलेज, परीक्षांमुळे नोटा बदलून घेण्यासाठी किंवा एटीएमच्या गर्दीत थांबण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही.’ इथलीच मनिषा या विद्यार्थिनीने सांगितले की, ‘कितीही त्रास झाला तरी चालेल. पण या देशातील काळ्या पशाची घाण दूर होणार असेल तर आम्ही हा त्रास सहन करु. तिची सहकारी दिपाली म्हणाली, ‘काही एटीएम तर रोख भरल्यानंतर अर्धा तासातच संपत आहेत. मग मी अभ्यास करावयाचा की भरलेले एटीएम हुडकत फिरावयाचे?’

नाव न छापण्याच्या अटीवर विद्यापीठ वसतिगृहात राहणारा एक विद्यार्थी म्हणाला, ‘आम्हाला कॉलेज बुडवण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे ते म्हणजे बँकेतील गर्दीचे. तर सिडनहॅम महाविद्यालयाच्या परिसरात काही अफगाणी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही अशाच प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचे सांगितले.

बारावीत शिकणारा फारुख हकिमी म्हणाला, ‘मी तब्बल पाच दिवस रोज बँकेत जात होतो. पण वेळेअभावी नोटा बदलून मिळाल्या नाहीत. काल मिळाल्या, पण आता दोन हजार रुपयांचे सुटे मिळेना. छोटय़ाछोटय़ा व्यवहारासाठी कुणी सुटे देईना. म्हणुन पर्याय नसल्याने आम्हाला मोठय़ा हॉटेलात जेवावे लागले’. तर बारावीतलाच अली मुर्तझा म्हणाला, ‘लहान दुकानदार आम्हाला सुटे पैसे देत नाही. आम्हाला उधारही देत नसल्याने खूप हाल होत आहेत. महंमद अली याने तर एका मित्राच्या ओळखीच्या खानावळीत उधारीवर जेवत असल्याचे सांगितले.

तर विद्यापीठ वसतीगृहात राहणाऱ्या प्रिया पवार हिने सांगितले की, ‘नोटाबंदीनंतर  चित्रपटाचे तिकिट, हॉटेलमधील जेवण, खरेदी हे सर्व ‘प्लॉस्टिक मनी’ वापरुनच करते.’