धर्मा प्रॉडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितिज रवी प्रसाद यांना ड्रग्ज प्रकरणी करण जोहरचं नाव घेण्यासाठी एनसीबीकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात केला. क्षितिज यांना शनिवारी एनसीबीने अटक केली. सुशांतच्या मृत्यूबाबत त्यांचीही चौकशी करण्यात आली होती. तर क्षितिज यांच्यावर कुठलाही दबाव टाकला जात नसून चौकशी योग्य रितीने करण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण एनसीबीकडून देण्यात आलं.

करण जोहर आणि इतर सहकाऱ्यांचं नाव बळजबरीने घेण्यास दबाव टाकला जात असल्याचं क्षितिज यांनी कोर्टात सांगितलं. तर दुसरीकडे एनसीबीच्या उपमहासंचालकांनी हे आरोप फेटाळले. क्षितिज यांना ब्लॅकमेल केला जात असल्याचा आरोप क्षितिज यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला आहे. “एनसीबीच्या मुंबई युनिटचे प्रभारी समीर वानखेडे यांना वगळता इतर सर्व अधिकारी क्षितिज यांच्याशी व्यवस्थित वागत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा क्षितिज यांचा जबाब नोंदवण्यात येत होता, तेव्हा समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर करण जोहर आणि इतर सहकाऱ्यांची नावं घेण्यास दबाव टाकला. त्यांची नावं घेतल्यास तुम्हाला सोडू असंही ते म्हणाले. मात्र त्यास क्षितिजने साफ नकार दिला”, असं मानेशिंदे ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाले.

क्षितिज यांनी केलेले सर्व आरोप फेटाळत एनसीबीचे उपमहासंचालक जैन म्हणाले, “चौकशीदरम्यान जो खुलासा केला जात आहे त्याबद्दलच माहिती मिळवली जात आहे. त्याशिवाय कोणत्याही प्रकारचा दबाव कोणावर टाकला जात नाहीये. तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. क्षितिज यांनी केलेले आरोप खोटे आहेत.”

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने अंमली पदार्थांचे सेवन करत नसल्याचं याआधी स्पष्ट केलं. “मी अंमली पदार्थांच्या विरोधात आहे. मी स्वत: ड्रग्जचं सेवन करत नाही. अंमली पदार्थांच्या सेवनाला उत्तेजनही दिलेले नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यात माझ्या घरी आयोजित केलेल्या पार्टीत ड्रग्ज नव्हते”, असं त्यानं स्पष्ट केलं आहे.