रोजच्या वापरातील घरातील वस्तू वापरून आयआयटी बॉम्बेच्या इंडस्ट्रियल स्कूल ऑफ डिझाइन विभागातील (आयडीसी) प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मास्क तयार केले आहेत. संस्थेच्या परिसरातील सुरक्षारक्षक, कर्मचाऱ्यांना हे मास्क देण्यात आले आहेत.
मास्क आणि सॅनिटायझरची मागणी वाढल्यामुळे बाजारात त्याचा काही वेळा तुटवडा जाणवतो. त्याचप्रमाणे उपलब्ध मास्कमध्ये अनेक त्रुटी असल्याचेही समोर आले आहे. त्या त्रुटी दूर करून आयडीसीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मास्क तयार केले आहेत. या मास्कमुळे व्यक्तीच्या डोळ्याच्या खालच्या भागापासून हनुवटीपर्यंतचा भाग झाकला जातो. यामुळे यात संबंधित व्यक्तीला संपूर्ण सुरक्षा मिळणे शक्य होणार आहे. येत्या काळात असे हजार मास्क तयार करण्यात येणार आहेत.
सॅनिटायझर तयार करणारे यंत्र
आयआयटी बॉम्बेतील प्राध्यापक अंबरीश कुंवर, प्रा. कुमारेसन आणि प्रा. पूर्बा जोशी यांनी सॅनिटायझर तयार करणारी दोन यंत्रे निर्माण केली आहेत. स्टील आणि अॅल्युमिनियमपासून बनवलेली ही यंत्रे आकाराने लहान आहेत. त्याच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर काही रसायनांचे मिश्रण करून सॅनिटायझर तयार करता येऊ शकते. प्राध्यापकांच्या या गटाने अवघ्या चार तासांत या यंत्रांची निर्मिती केली आहे.