अनेक संस्थांनी वेतन थकवले; इतर व्यवसायही थंडावले

मुंबई : राज्यातील अनेक विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे अगदी वर्षभराचे वेतनही संस्थांनी थकवले असून आता प्राध्यापकांनी सुरू केलेले इतर व्यावसायही थंडावले आहेत. टाळेबंदीच्या काळातही ऑनलाइन वर्ग घेण्याची धडपड करताना प्राध्यापकांसमोर चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यातील विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांचे पगार संस्थाचालकांनी अनेक महिने थकवले आहेत. राज्यातील काही महाविद्यालयांतील प्राध्यापकांना अगदी आठ ते दहा महिने पगार मिळालेला नाही. अनेक ठिकाणी कबूल केलेला पगार देण्यात येत नाही. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा येथील अनेक नामांकित संस्थांमधील प्राध्यापकांनी वेतनाबाबत सातत्याने तक्रारी केल्या आहेत. अनेक महिने पगार मिळत नसल्यामुळे अनेक प्राध्यापकांनी दुसरे व्यवसाय सुरू केले होते. कॅब किंवा रिक्षाचालक म्हणून काम करण्यापासून शेती करणे, भाजीचे दुकान सुरू करणे, खाद्यपदार्थाचे दुकान सुरू करणे अशी कामे प्राध्यापकांनी सुरू केली होती. मात्र आता व्यवसायही बंद आणि महाविद्यालयातून अनेक महिने वेतन नाही अशी प्राध्यापकांची अवस्था आहे. एकाच संस्थेत काम करणाऱ्या पती-पत्नींना अधिकच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांबरोबरच तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीही आर्थिक कोंडी झाली आहे. एकीकडे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन तासिका घेण्यासाठी आटापिटा करताना दुसरीकडे आपल्या कुटुंबाला कसे पोसायचे, असा प्रश्न वेतन चुकवणाऱ्या संस्थांमधील प्राध्यापकांना भेडसावत आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या आदेशाकडे दुर्लक्ष

देशभरातील तंत्रशिक्षण संस्थांचे नियमन करणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) टाळेबंदीच्या काळात प्राध्यापकांचे वेतन न चुकवण्याचे किंवा प्राध्यापकांना नोकरीवरून न काढण्याचे आदेश दिले आहेत. मात्र संस्थांनी या आदेशांकडे दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. आधीच्या अनेक महिन्यांबरोबरच अनेक संस्थांतील प्राध्यापकांना मार्च महिन्याचे वेतनही संस्थांनी अद्याप दिलेले नाही. ‘महाविद्यालयातील अध्यापन मार्च-एप्रिलनंतर बंदच होते. या महिन्यांमध्ये संस्थांना एरवीही काही उत्पन्न नसते. महाविद्यालयांचे शुल्क वर्षांच्या सुरुवातीला जमा होते. त्यामुळे टाळेबंदीमुळे वेतन देता येणे शक्य नसल्याचे बहाणे शिक्षणसंस्थानी करणे योग्य नाही,’ असे मत एका प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.