देशभरातील अडीचशेहून अधिक प्राध्यापक गैरप्रकारात सहभागी असल्याचे उघड

मुंबई : आयती पीएच.डी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रबंध लिहून देण्याच्या गैरप्रकारात देशभरातील विद्यापीठांचे प्राध्यापकही असल्याचे समोर आले आहे. अडीचशेहून अधिक कार्यरत आणि निवृत्त प्राध्यापक पीएच.डीचे प्रबंध, शोधनिबंध, विद्यार्थ्यांचे प्रकल्प लिहून देण्याचे काम करत असून त्यात मुंबई-पुण्यातील प्राध्यापकही असल्याचा दावा ‘शोधइंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळाने केला आहे.

प्रबंध आणि शोधनिबंध लिहून देण्याचा धंदा करणाऱ्या ‘शोधइंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या प्रतिनिधींशी लोकसत्ताने संपर्क साधला. वाङ्मय चोरीच्या प्रमाणानुसार प्रबंध लिखाणाचे दरपत्रकच जाहीर करणाऱ्या या संस्थेच्या प्रतिनिधींबरोबरील संभाषणातून पीएच.डी आणि संशोधनातील अनेक गैरप्रकार उजेडात आले. पीएच.डी लिहून देण्याच्या या धंद्यात प्राध्यापक सहभागी आहेत. काही मोबदला घेऊन प्राध्यापक पंधरा दिवस ते तीन महिन्यांत प्रबंध लिहून देत असल्याची दावा ‘शोधइंडिया (डॉट) कॉम’च्या प्रतिनिधीने केला.

‘शोधइंडिया (डॉट) कॉम’ संकेतस्थळावरील क्रमांकावर प्रतिनिधी आणि लोकसत्ताच्या वाचकांनी विद्यार्थी म्हणून संपर्क साधला. त्यावेळी ‘प्रबंध योग्य असेल का?’, ‘विषयाची काही माहिती द्यावी लागेल का?’ असे प्रश्न विचारले असता ‘प्रबंध किंवा शोधनिबंध लिहून देणारी माणसे आमच्या कंपनीत आहेत. देशभरातील प्रध्यापक त्यासाठी काम करतात.

सध्या साधारण २५० प्राध्यापक प्रबंध लिहून देण्याचे काम करीत आहेत. त्यापैकी काही निवृत्त आहेत. विविध ठिकाणी आमचे काम चालते. स्थानिक भाषा किंवा हिंदीतूनही प्रबंध लिहून देणारे प्राध्यापक आमच्याशी जोडले गेले आहेत,’ अशा आशयाची माहिती संस्थेच्या प्रतिनिधीने दिली.

मुंबई, पुण्यातील प्राध्यापक..

‘शोधइंडिया (डॉट) कॉम’ या संकेतस्थळावर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या प्राध्यापकांची नावे दिली आहेत. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, कोलकता विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ, नॉर्थ बेंगॉल विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ, राजस्थान विद्यापीठ, मगध विद्यापीठ, पटना येथील जैवतंत्रज्ञान विद्यापीठ, तामिळनाडू विद्यापीठ, ओडिसा विद्यापीठातील प्राध्यापकांची नावे संकेतस्थळावर देण्यात आली आहेत. या नावांची पडताळणी केली असता काही प्राध्यापकांची नावे विद्यापीठाच्या यादीत सापडली नाहीत. काही साधर्म्य असलेली नावे विद्यापीठांमध्ये कार्यरत असल्याचे दिसले मात्र, त्यांचे विषय वेगळे असल्याचे आढळले. मुंबई आणि पुणे विद्यापीठात कार्यरत असल्याचा दावा करण्यात आलेल्या नावाचे प्राध्यापक हे विद्यापीठात सध्या कार्यरत नसल्याचे समोर आले.