मुंबईमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांना दादर येथील चैत्यभूमीवर जाता येणार नाही. तथापि, शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाइन अथवा प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून अनुयायांनी घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे अनुयायी मोठय़ा संख्येने चैत्यभूमीवर येत असतात. पालिकेकडून अनुयायांसाठी तात्पुरता निवारा, वैद्यकीय सेवा आदी विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतात. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शासकीय मानवंदनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाइन व प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे अनुयायांनी चैत्यभूमीवर जाण्याऐवजी घरात बसून डॉ. बाबासाहेब आंबडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन अतिरिक्त पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

सुविधा नाहीत.. महापालिकेतर्फे चैत्यभूमीवर सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती वा दिवाबत्ती करण्यात येत असली तरीही अनुयायांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करण्यात येणार नाहीत.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

* दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. करोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करता यावे, करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध आहेत.

* यामुळे यंदा महापरिनिर्वाण दिनी अनुयायांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करता येणार नाहीत, असे अतिरिक्त पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले.