लावणी कलावंतांची मागणी

मुंबई : महाराष्ट्राची लोककला म्हणून कायमच अग्रस्थान मिळालेल्या लावणीच्या सादरीकरणासाठी सवलतीच्या दरात रंगमंच उपलब्ध होत नसल्याने अनेक कलावंत कामापासून वंचित आहेत. मुंबईतील नाट्यगृहे लावणीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावीत, अशी मागणी कलावंतांनी केली आहे.

करोनापूर्वीही लावणी किंवा सांगीतिक कार्यक्रमांसाठी नाटकापेक्षा अधिक भाडे आकारले जात होते. परंतु शिथिलीकरणानंतर याचा मोठा फटका लावणी कलावंतांना आणि निर्मात्यांना बसला आहे. नाटकांसाठी राज्यभरातील नाट्यगृहे नाटकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध होत असली तरी त्याच ठिकाणी होणाऱ्या लावणीच्या कार्यक्रमांसाठी पूर्ण दर आकारला जातो. त्यामुळे ७ हजार भाडे आणि ९० रुपये तिकीट, तिकीट वाढवल्यास भाडे दुप्पट असे नाट्यगृहांचे जाचक नियम लावणी कलाकारांच्या उपासमारीला कारणीभूत ठरले आहेत. लावणीच्या कार्यक्रमात एकावेळी २० ते ३० कलावंत काम करतात. त्यामुळे प्रत्येकाचे मानधन, निर्मिती खर्च, प्रवासखर्च यामुळे ९० रुपये तिकीट दर ठेवून कार्यक्रम करणे शक्य नाही. नाटकासाठी नाट्यगृहाचे भाडे साडे तीन हजार रुपये आणि ४०० रुपये तिकीट आकारण्यास मुभा आहे. मग हीच सवलत लावणीला का नाही, असा प्रश्न निर्मात्यांनी उपस्थित केला आहे.

समस्या काय?

लावणीला नाटकाप्रमाणे नाट्यगृह भाड्यात सवलत मिळत नसल्याने कार्यक्रम करणे शक्य होत नाही. सुट्टीच्या वारी लावणीला नाट्यगृह दिले जात नाही. काही नाट्यगृहांमध्ये तर लावणी प्रकारालाच बंदी आहे. लावणीची भव्यता आणि निर्मिती खर्च पाहता सवलतीची गरज या कलावंतांनाही भासते आहे. ‘पंचवीस-तीस हजार रुपये भाडे भरून लावणीचे कार्यक्रम करणे परवडत नाही. आज कार्यक्रम थांबल्याने १ हजारांहून अधिक लावणी कलावंत, आर्थिक विवंचनेत आहेत. सरकारने आणि नाट्यगृह व्यवस्थापकांनी आमचाही विचार करावा,’ अशी विनंती लावणी कार्यक्रम निर्माते मंगेश मोरे यांनी केले आहे.

गेली तीन महिने पाठपुरावा केल्यानंतर शुक्रवारी ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये सवलत देण्यात आली.  केवळ लोककला म्हणून लावणी हवी असते पण तिची आजवर उपेक्षाच झाली आहे, जी आम्हाला शासन दरबारीही जाणवते. नाटक सादर करणारे ते कलावंत मग आम्ही कोण़. टाळेबंदीत लावणी कलावंतांवर आत्महत्या करण्याची वेळ आली तरी कुणी दखल घेतली नाही. लावणीलाही समान सवलत मिळावी यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांसह राज्यभरातील नाट्यगृहांना निवेदन देणार आहे.

– मेघा घाडगे, अभिनेत्री, नृत्यांगना