राज्य परिवहन महामंडळातर्फे १ सप्टेंबरपासून पुणे रेल्वे स्टेशन ते मंत्रालय मार्गावर वातानुकूलित शिवनेरी सेवेच्या दोन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्याहून मंत्रालय वा दक्षिण मुंबईत कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
सध्या पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या शिवनेरी दादपर्यंत येत होत्या. त्यामुळे मंत्रालय वा दक्षिण मुंबईतील इतर सरकारी वा व्यावसायिक कार्यालयांमध्ये पोहोचण्यासाठी प्रवाशांना पुन्हा लोकल वा बसचा प्रवास घडायचा. आता पुण्याहून थेट मंत्रालयापर्यंत शिवनेरी येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. पुणे-मंत्रालय शिवनेरी पुणे रेल्वे स्थानकावरून रोज सकाळी ६ आणि दुपारी २ वाजता सुटेल. औंध, हिंजवडी, वाकड, द्रुतगती महामार्ग, कोकण भवन, नेरुळ फाटा, वाशी हायवे, मैत्री पार्क, दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस मार्गे मंत्रालय असा या शिवनेरीचा मार्ग असेल. या बसचे तिकीट ४५० रुपये असेल.