मुंबई पालिकेचे स्पष्टीकरण

मुंबई : करोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक असलेल्या फेविपिराविर या औषधी गोळ्यांची खरेदी नियमानुसारच केल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले आहे. राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरपत्रकानुसारच गोळ्या खरेदीचा दर आहे. तसेच भरमसाट गोळ्या खरेदी करून पैशाचा अपव्यय केला नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

फेविपिराविर या गोळ्या जादा दराने खरेदी केल्याचे तसेच अनावश्यक प्रमाणात साठा मागवल्याचे आरोप पालिकेवर होऊ लागले होते. हे सर्व आरोप पालिका प्रशासनाने फेटाळून लावले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांनी १८ जुलै २०२० रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विविध इंजेक्शन तसेच औषधी गोळ्यांच्या खरेदीचे दर निश्चित करून देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेनेदेखील या शासन परिपत्रकाच्या आधारे पालिका प्रशासनाचे परिपत्रक निर्गमित केले आहे. महानगरपालिकेने ७८ रुपये प्रति टॅब या दराने औषधी खरेदी केल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र फेविपिराविर औषधी गोळ्यांची खरेदी वस्तू व सेवा कर मिळून रुपये ५८.८० प्रति टॅब या राज्य सरकारच्या दरानेच केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

तसेच महापालिकेने अनावश्यक २७ लाख औषधी गोळ्यांची खरेदी केलेली नाही, तर विविध खात्यांना या औषधी गोळ्यांची एका महिन्यासाठी किती आवश्यकता भासू लागेल, याचे मूल्यमापन करून गरज निश्चित करण्यात आली आहे. मात्र खात्यांनी एका वेळी १० दिवसांसाठी आवश्यक एवढय़ाच संख्येने या औषधी गोळ्यांची खरेदी करण्याचेही निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

पालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक पालिका रुग्णालयात फेविपिराविर औषधी गोळ्यांची १७ हजार ५०० पाकिटे अधिकच्या दराने खरेदी करून १.२ कोटी रुपयांचा अपव्यय झाल्याचा आरोपही पालिकेने फेटाळून लावला आहे. शीव रुग्णालयात ५ हजार पाकिटे (एकूण १ लाख ७० हजार गोळ्या) प्राप्त झाल्या आहेत. ही खरेदीदेखील शासनाकडून निश्चित दराने म्हणजे रुपये ५८.८० प्रति गोळी याप्रमाणेच करण्यात आली आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.