७५ कोटींच्या कर्ज वितरण प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप असलेले ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे उप व्यवस्थापकीय संचालक शामलाल आचार्य यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकून दागिने आणि रोख रक्कम असा ६७ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने आचार्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आचार्य बँकेच्या मिड-कॉर्पोरेट विभागाचेही प्रमुख आहेत. या प्रकरणी स्टेट बँकेचे सल्लागार आणि माजी सहायक महाव्यवस्थापक के. के. कुमाराह आणि वर्ल्ड विन्डोज् ग्रुपचे अध्यक्ष पियुष गोयल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीने स्टेट बँकेकडे ४०० कोटींचे कर्ज मागितले होते. मात्र प्रत्यक्षात ७५ कोटींचे कर्ज मंजूर झाले होते. या व्यवहारानंतर कुमाराह स्टेट बँकेच्या सल्लागार पदाचा त्याग करून कंपनीत दाखल झाले होते. या मोबदल्यात कुमाराह यांना २५ लाख तर आचार्य यांना १५ लाख रुपये मिळणार होते. कुमाराह यांनी प्रत्येक आठ लाख रुपये किमतीची दोन रोलेक्स घडय़ाळे विकत घेऊन ती आचार्य यांना दिली. आचार्य यांच्या घरातून बाहेर पडताना पाळतीवर असलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

चाकूचा धाक दाखवून लूटमार
ठाणे : ठाणे येथील पोखरण रोड भागात शनिवारी रात्री तीन दरोडेखोरांनी एका कंपनीतील कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून सुमारे सव्वा चार लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याचा प्रकार घडला. या कर्मचाऱ्याच्या तोंडाला शाल बांधून त्याला बांबूने मारहाणही करण्यात आली. या घटनेप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोखरण रोड परिसरात  ‘एसएमएस’ टॅक्सी टॅब. प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यालय असून या ठिकाणी टॅक्सीच्या भाडय़ाचे  पैसे जमा करण्यात येतात. संत ज्ञानेश्वरनगरमध्ये राहणारे श्रीकांत सुरेश माने (२५) हे या कार्यालयात काम करतात. शनिवारी रात्री श्रीकांत कार्यालयात काम करीत असताना तिघांनी त्यांना मारहाण करत लूटमार केली.

वसतिगृहातील मुलींना मारहाण करणारा गृहपाल निलंबित
शहापूर : शहापूर आदिवासी विकास प्रकल्पामागील मुलींच्या वसतिगृहातील आवारात शिळे अन्न पडले असल्याचा राग आल्याने वसतिगृहातील १२ विद्यार्थिनींना स्टीलच्या पट्टीने मारहाण करणाऱ्या गृहपाल शोभा नेमाडे यांना अप्पर आयुक्तांनी तात्काळ निलंबित केले आहे. रविवारी सायंकाळी मारहाणीची घटना घडली होती. यासंबंधी पालकांनी तक्रारी नोंदविल्यानंतर आदिवासी विकास प्रकल्प समितीचे अध्यक्ष पांडुरंग बरोरा यांनी याठिकाणी भेट दिली. त्यानंतर शहापूरचे प्रकल्प अधिकारी किरण माळी यांनीही या प्रकरणाची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर प्रकल्प अधिकारी माळी यांनी नेमाडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठाण्याच्या अप्पर आयुक्तांकडे पाठविताच त्यांनी निलंबनाचे आदेश दिले.

तरुणीचा विनयभंग
ठाणे : कळवा येथील सम्राट अशोकनगरमध्ये असलेल्या एका खासगी क्लासमधील शिक्षकाने १२ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी कळवा पोलिसांनी जगदीश उर्फ जग्गनाथ लक्ष्मण पांढरपिसे (२४) या शिक्षकास अटक केली आहे. शिक्षक वारंवार विनयभंग करत असल्याची माहिती पीडित मुलीने कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर जगदीशला अटक करण्यात आली.