रूळ किंवा वेल्डिंग फ्रॅक्चर जोखण्याची नवीन प्रणाली लवकरच विकसित

दोन वर्षांतील रेल्वे अपघातांमधील ४७ टक्के अपघात गाडी घसरल्यामुळे
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दोन वर्षांत नोव्हेंबर २०१३ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत झालेल्या मोठय़ा अपघातांपैकी बहुतांश अपघात गाडी रुळावरून घसरून झाल्याचे समोर येत आहे. मात्र हे अपघात टाळण्यासाठी आता परिमाण आणि आराखडा संशोधन संस्था (आरडीएसओ) एक तंत्रज्ञान विकसित करत असून या तंत्रज्ञानानुसार रुळाला गेलेले तडे किंवा वेल्डिंग फ्रॅक्चर यांची माहिती आगाऊ मिळणार आहे. त्यामुळे गाडय़ा रुळावरून घसरण्याच्या घटना भविष्यात टळण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर २०१३ ते सप्टेंबर २०१५ या सुमारे दोन वर्षांच्या काळात भारतीय रेल्वेवर तब्बल २३३ दखल घेण्याजोगे मोठे अपघात झाले. यापैकी ४७ टक्के, म्हणजेच १०९ अपघात गाडी रुळावरून घसरल्याने झाले आहेत. त्यातही यंदा नोव्हेंबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत १०० अपघातांपैकी ४७ अपघात या कारणाने झाले आहेत. गाडी रुळावरून घसरण्यासाठी कारणीभूत घटकांमध्ये रेल्वे रुळाला तडा जाणे आणि वेल्डिंग फ्रॅक्चर हे महत्त्वाचे घटक आहेत. सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार रेल्वेमार्गावर गस्त घालणारे रेल्वेचे की-मेन आणि गँगमेन हे या दोन गोष्टींकडे लक्ष देतात. मात्र एखाद्या ठिकाणी रेल किंवा वेल्ड फ्रॅक्चर झाले असल्यास त्याबाबतची माहिती तातडीने जवळच्या स्थानकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था त्यांच्याकडे नसते. अनेकदा की-मेन किंवा गँगमेन यांनी दिलेल्या सूचनांवरून अपघात टळल्याच्या घटना घडल्या असल्या, तरी हा खात्रीलायक उपाय मानता येत नाही.
त्यामुळे आता रूळ व वेल्डिंग फ्रॅक्चर यांबाबत अचूक माहिती तातडीने मिळवण्यासाठी परिमाण आणि आराखडा संशोधन संस्था नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे. याआधी या संस्थेने श्रव्यातित तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत विविध कंपन्यांकडून इरादापत्रे मागवली होती. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार असल्याची माहिती या संस्थेतील सूत्रांनी दिली. यासाठी जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून इरादापत्रे मागवण्यात आल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.