यंत्रणेच्या प्रसारासाठी रेल्वेच्या जिंगल्स; डोंबिवलीच्या सुखदा भावे-दाबकेच्या सुरावटी सगळीकडे वाजणार

रेल्वे प्रवाशांच्या हाती तिकीट खिडकी सोपवणाऱ्या मोबाइल तिकीट प्रणालीला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता मध्य रेल्वेने या प्रणालीच्या प्रसारासाठी संगीताची साथ घेतली आहे. प्रवाशांना या प्रणालीची माहिती देण्यासाठी मध्य रेल्वेने काही जिंगल्स तयार केल्या आहेत. या जिंगल्स आता सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवर वाजणार आहेत. विशेष म्हणजे या जिंगल्स डोंबिवलीच्या तरुण संगीतकार सुखदा भावे-दाबके हिने तयार केल्या आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणालीचे लोकार्पण केले होते. मात्र पश्चिम व मध्य रेल्वेवर या प्रणालीला प्रवाशांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. उपनगरीय रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या ७५ लाख दैनंदिन प्रवाशांपैकी फक्त तीन ते पाच हजार प्रवासीच या प्रणालीचा वापर करत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने या प्रणालीच्या प्रसारासाठी संगीताचा आधार घेतला आहे. त्यासाठी सुरावटी तयार करण्याचे काम डोंबिवलीकर संगीतकार सुखदा भावे-दाबके हिने केले आहे.

याबाबत सुखदाला विचारले असता तिने मोबाइल तिकीट प्रणालीच्या प्रचारासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या या सांगीतिक आधाराचे कौतुक केले. एखादी गोष्ट सुरांमध्ये गुंफून लोकांना सांगितली की, त्यांना ती पटकन् कळते आणि भिडतेही. तसेच रेल्वेची ही कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणाली लोकांसाठीच नाही, तर पर्यावरणासाठीही फायद्याची आहे. त्यामुळे लोकांनीही या प्रणालीचा फायदा घ्यावा, असे तिने सांगितले.

मध्य रेल्वेसाठी या सुरावटी बनवण्याचा अनुभवही उत्तम होता. लहानपणापासून आपण उपनगरीय रेल्वेने प्रवास करत आहोत. दर दिवशी या रेल्वेच्या उद्घोषणाही ऐकल्या आहेत. पण या उद्घोषणा प्रणालीवर स्वत: केलेली रचनाही आता ऐकायला मिळणार याचा आनंद असल्याचेही सुखदाने स्पष्ट केले.

या जिंगल्स तयार करण्यात मध्य रेल्वेचे कर्मचारी आणि रेल्वेच्या सांस्कृतिक विभागाचे सदस्य संतोष वेरूळकर यांचाही मोलाचा वाटा आहे. मोबाइल तिकीट प्रणाली हा लोकांचा हक्क आहे. त्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी हा उपक्रम केल्याचे वेरूळकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

या सुरावटींबाबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. आलोक बडकुल यांनीही समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल तिकीट प्रणाली ही प्रवाशांना रेल्वेने दिलेली मोठी शक्ती आहे. कोणत्याही रांगेत उभे न राहता चालता चालता तिकीट काढण्याची सुविधा प्रवाशांनी वापरावी, हा यामागील हेतू आहे. हा हेतू या जिंगल्सच्या माध्यमातून खूपच समर्पकपणे पोहोचत असल्याचे डॉ. बडकुल यांनी सांगितले. तर, या सुरावटी लवकरच एफएम वाहिन्यांवरही वाजतील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.