माहिती अधिकारातून उघड; मध्य रेल्वेवर साडेतीनशेहून अधिक वेळा रूळ तुटण्याच्या घटना

‘रेल्वेच्या रुळांना तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत’ ही बातमी पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर मुंबईकरांना आश्चर्याचा धक्का बसत असला तरी सिग्नल यंत्रणेतील बिघाडासारखे हे कारणही आता उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत होण्यासाठी नेहमीचे ठरू लागले आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर रुळांना तडे जाण्याच्या वा तुटण्याच्या ५२० घटना घडल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील बिघाडाची संख्या जास्त असून प्रत्येक घटनेनंतर वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर येत आहे.

पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय लोकल सेवा चर्चगेट ते डहाणू आणि मध्य रेल्वेचा पसारा सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा आणि हार्बर पनवेल आणि अंधेरीपर्यंत आहे. या मार्गावरून दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. आधीच वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि त्यातच रेल्वे मार्गावर होणाऱ्या गुन्हेगारी घटना यामुळे  प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. गेल्या काही वर्षांत रुळाला तडा जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे लोकल गाडय़ा विस्कळीत होतानाच अपघातांचाही धोका संभवतो. २०१४ पासून ऑक्टोबर २०१७ पर्यंत तब्बल ५२० वेळा रूळ आणि वेल्ड तुटण्याच्या घटना पश्चिम तसेच मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावर घडल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे वातावरणातील बदलांमुळे रुळाला तडा जात असल्याचे कारण देतानाच अन्य कारणेही देण्यात आली आहेत. तसेच मुंबईला लाभलेला समुद्रकिनारा आणि त्यामुळेही वातावरणात बदल होत असून त्याचाही फटका रुळाला बसतो. महत्त्वाची बाब म्हणजे रुळांच्या बाजूलाच मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या झोपडय़ांमधून टाकला जाणारा ओला तसेच सुका कचरा आणि त्यामुळे रुळाची झीज होऊन त्याला धोका पोहोचतो.

रुळांची तपासणी आणि रुळ तुटल्यास ते कसे ओळखले जाते?

  • रुळांची तपासणी ही गँगमन, किमॅन आणि ट्रॅकमॅनकडून केली जात असते. त्यामुळे रुळाला तडा असल्यास त्याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली जाते.
  • लोकल गाडय़ांचे मोटरमन आणि मेल, एक्स्प्रेस गाडय़ा चालविणारे लोको पायलट यांनाही रूळ तुटले असल्यास ते ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असते. रुळांच्या हालचालीत बदल त्यांना ओळखता येतात.
  • रुळांमार्फतच सिग्नल यंत्रणेला तांत्रिक पुरवठा केला जात असतो. तडा गेला असल्यास सिग्नल यंत्रणेत बदलही होतो आणि ते पाहताच रेल्वे गाडी थांबविली जाते.

बुलेट ट्रेन चालविण्यापेक्षा मुंबई विभागात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या रूळ आणि त्यांचे वेल्डिंग तुटण्याच्या घटना रोखणे महत्त्वाचे आहे. या घटनांचे प्रमाण शून्यावर आणले पाहिजे. त्यामुळे लोकल गाडय़ांना कोणताही धोका पोहोचणार तर नाही शिवाय प्रवाशांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.

समीर झवेरी (माहिती अधिकार कार्यकर्ते)