ऐन गर्दीच्या वेळी सकाळी सकाळी अंबरनाथ आणि उल्हासनगर या स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची उपनगरीय वाहतूक पुरती कोलमडली. हा तडा सांधायला अर्धा तासाचा कालावधी लागला. मात्र तोपर्यंत सकाळच्या वेळी चार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी गाडय़ांची वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने चालू होती.
अंबरनाथ व उल्हासनगर या स्थानकांदरम्यान सकाळी ७.५० वाजता डाऊन दिशेच्या रुळाला तडा गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवून हा तडा सांधण्याचे काम जोरात हाती घेण्यात आले. हे काम अर्धा तास चालू होते. अखेर सकाळी ८.२०च्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र या कालावधीत चार उपनगरीय फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वेने सीएसटी ते कल्याण या दरम्यान दोन विशेष फेऱ्या सोडल्या. मात्र मुंबईकडे येणाऱ्या गर्दीला त्याचा काहीच फायदा झाला नाही. या गोंधळामुळे मध्य रेल्वेवरील गाडय़ांची वाहतूक तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू होती.