एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमधील पीडितांना अखेर आर्थिक मदत देण्यात आली आहे. रेल्वेकडून ही आर्थिक मदत देण्यात आली असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी आठ लाख तर गंभीर जखमींना सात लाख आणि किरकोळ जखमींना दोन लाख रुपये देण्यात आले आहेत. 29 ऑगस्टला एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला होता. जवळपास साडेसहा महिन्यानंतर रेल्वेकडून पीडितांना मदत पुरवण्यात आली आहे. 17 मृत आणि 19 जखमी अशा 36 पीडितांना ही आर्थिक मदत करण्यात आली आहे.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर अरुंद पुलांचा मुद्दा उपस्थित झाला होता. दुर्घटनेनंतर खडबडून जागं झालेल्या रेल्वे मंत्रालयाने परळ ते एल्फिन्स्टन रोड स्थानकाला जोडणारा पूल, करी रोड आणि आंबिवली स्थानकातील पादचारी पुलांचे काम तातडीने सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. हे काम लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लष्कराकडे पूलबांधणीचे काम दिल्याने यावर टीका देखील झाली होती. पण लष्कराने ११७ दिवसांत एल्फिन्स्टन रोड स्थानकातील व अन्य दोन पुलाचे काम पूर्ण केले आहे. या तीनही पूलाचे जानेवारी २०१८ पर्यंत उभारण्याचे उद्द्ष्टि लष्कराने ठेवले. मात्र काही अडचणींमुळे त्यांची कामे पूर्ण होण्यास उशिर झाला होता.

घटनेनंतर रेल्वेकडून एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. समितीने जवळपास 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. यानंतर या दुर्घटनेला पाऊस आणि अफवा जबाबदार असल्याचा निकाल त्यांनी दिला होता. एकूण 39 जणांनी मदतीसाठी अर्ज केला होता, ज्यांच्यापैकी 36 जणांना मदत देण्यात आली आहे. रेल्वेने तीन प्रकरणांमध्ये तांत्रिक अडचण आली असल्याचं सांगत लवकरच त्यांचाही निकाल लागेल असं आश्वासन दिलं आहे.