मुंबईकरांवरील पाण्याचे संकट दूर करून बेपत्ता झालेला मान्सून परतला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी येत असून सोमवार व मंगळवारी कोकणात मुसळधार वृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा असल्याने पुढील ४८ तासात कोकण परिसरात, विशेषत दक्षिण कोकण व गोवा येथे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान शनिवार आणि रविवारीही कोकण तसेच राज्यातील अंतर्गत भागात पावसाच्या
सरी आल्या.
कोकणात पाऊस पडला तरी मुंबईकरांना मात्र घामाच्या सरी झेलाव्या लागल्या. शहरात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. पाऊस गायब असला तरी हवेतील बाष्पाचे प्रमाण ९० टक्क्य़ांहून अधिक आहे. संध्याकाळीही हवेतील बाष्प कायम असल्याने तापमान कमी असतानाही घामाने मुंबईकर हैराण झाले.