दरवर्षी नवनवीन प्रयोगांनंतरही पावसाळ्यात पूरस्थिती

मुंबई : हिंदमाता परिसर हे मुंबई महापालिके ला पडलेले एक भौगोलिक कोडे आहे आणि गेल्या कित्येक वर्षांत हे कोडे महापालिके ला सोडवता आलेले नाही. या परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी दरवर्षी पालिका वेगवेगळे प्रयोग करत पुढच्या वर्षी पाणी साचणार नसल्याचे दावे करते. मात्र, प्रत्येक वर्षी हा परिसर पाण्याखाली जातो आणि पालिका त्यापुढे गुडघे टेकते. आता या वर्षी पालिके ने भूमिगत टाक्यांचा प्रयोग हाती घेतला असून त्याचा निकाल मात्र पुढच्या वर्षी लागेल.

खोलगट बशीसारखी मुंबईची भौगोलिक रचना आणि समुद्राने वेढलेले बेट यामुळे मुंबईतील काही सखल भागांत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो. अशा ठिकाणांपैकी एक असलेल्या हिंदमाता परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिके ने आतापर्यंत अनेक प्रयोग के ले. हिंदमाता परिसरात पाणी वाहून नेण्यासाठी ब्रिटानिया उदंचन के ंद्र (पंपिंग स्टेशन) बांधण्यात आले. तरीही निचरा न झाल्यामुळे २०१७ मध्ये अभ्यासपूर्ण सूक्ष्म नियोजन करण्यात आले. त्यानंतर हिंदमाता परिसरातील पर्जन्यजल वाहिन्यांच्या सक्षमीकरणाची व पुनर्बाधकामाची कामे हाती घेण्यात आली होती. हिंदमाता परिसराला जोडणाऱ्या ७ किमी लांबीच्या पर्जन्यजल वाहिन्यांचे सक्षमीकरण करण्यात आले.

आता हिंदमाता परिसरातील साचणारे पाणी हे सेंट झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन उद्यानातील भूमिगत टाक्यांमध्ये साठविण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या भूमिगत टाक्यांना जोडणाऱ्या भूमिगत वाहिन्या टाटा मिल परिसरातून नेण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाले की साधारण पुढच्या वर्षी हिंदमाता परिसराला मोठा दिलासा मिळेल, असा दावा आता पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो आहे.

दोन उड्डाणपुलांमध्ये कनेक्टर

दरवर्षी पावसाळ्यात कमरेइतके  पाणी भरले की वाहतूक ठप्प होते. त्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग के ले जातात. त्याला यश येत नसल्यामुळे पालिके ने यंदा वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून एक समांतर प्रयोग के ला होता. परळ उड्डाणपूल आणि हिंदमाता उड्डाणपुलादरम्यान महानगरपालिकेने जोडरस्ता बांधला आहे. या दोन्ही पुलांच्या मधील रस्त्याची उंची वाढविण्यात आली असून त्यामुळे पाणी तुंबले तरी वाहतूक सुरळीत सुरू राहील अशी ही योजना आहे. या प्रयोगामुळे बुधवारच्या पावसात हिंदमाता परिसरात वाहतूक सुरळीत होती, असा दावा पालिका प्रशासनाने के ला आहे.

पाण्याचा निचरा का होत नाही?

हिंदमाता परिसरातील पर्जन्यजल वाहिनीचे मुख आणि त्यापासून सुमारे ७ किमी अंतरावर असणारे ब्रिटानिया पातमुख यांच्या पातळीतील फरक (उतार) २.५ मीटर आहे. हा फरक कमी असल्यामुळे पावसाचे पाणी गुरुत्वाकर्षणाने वाहून येण्याची गती अतिशय कमी आहे. त्यामुळे पालिके ने आता या पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधण्याचे ठरवले आहे.