पाच ऑगस्टच्या पावसाची पुनरावृत्ती

मुंबई: मुंबईमध्ये मंगळवारी (२२ सप्टेंबर) रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहर भागातील अनेकांना गेल्याच महिन्यात ४-५ तारखेला पडलेल्या पावसाची आठवण करून दिली. पहाटे तीन वाजता भरतीची वेळ आणि त्यातच पडलेला मुसळधार पाऊस यामुळे पुन्हा ग्रँट रोड, परळ, वरळी, एलफिन्स्टन हे भाग पाण्याखाली गेले. या भागांतील बैठय़ा घरांमध्ये आणि इमारतींच्या तळमजल्यांवर असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.

हवामान खात्याने अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असल्यामुळे सखल भागातील रहिवासी आधीच सावध होते. मात्र दिवसभर फारसा न कोसळलेला पाऊस मध्यरात्री दोन वाजेनंतर इतका प्रचंड कोसळू लागला की या पावसामुळे सखल भाग अवघ्या तासाभरातच पाण्याखाली गेला. गेल्याच महिन्यात चार आणि पाच ऑगस्टला पडलेल्या पावसाची धास्ती या भागातील लोकांमध्ये अद्याप कायम असतानाच २३ सप्टेंबरच्या मध्यरात्री ३ वाजता पावसाने पुन्हा दक्षिण व मध्य मुंबईला जोरदार झोडपले.

दक्षिण मुंबईत विशेषत: ग्रँट रोड, मशीद बंदर येथे तर मध्य मुंबईत भायखळा, नागपाडा, दादर, वरळी, नायगाव या परिसरांत २४ तासांत ३०० मिलिमीटर अधिक पाऊस पडला. गेल्या तीस वर्षांत जिथे पाणी भरले नाही, अशा भागांत चार आणि पाच ऑगस्टला पाणी भरले होते. त्याच भागात या वेळीही पाणी भरल्यामुळे रहिवाशांना पुन्हा त्या दिवसाच्या भीतीदायक आठवणी जाग्या झाल्या.

साचलेल्या पाण्यामुळे सखल भागातील बैठय़ा घरातील व तळमजल्यांवरील घरातील लोकांचे प्रचंड नुकसान झाले. घरातील भांडीकुंडी, धान्य, फ्रिज, कपडे या सगळ्यांचा चिखल झाला, अशी माहिती ग्रँट रोडच्या स्लेटर रोड येथील रहिवासी सुनील घुगे यांनी दिली.

वरळीच्या बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक १०२ ते ११५ अशा १३ इमारतींच्या तळमजल्यावरील सर्व घरांमध्ये पाणी शिरले होते, अशी माहिती रहिवासी विजय भणगे यांनी दिली. वरळीच्या नेहरूनगर, अरविंदनगर या भागातील बैठय़ा घरांमध्येही पाणी शिरले होते. पहाटे तीन वाजता पाणी शिरल्यानंतर पटापट घरातले सामान टेबलवर, खाटेवर ठेवून रहिवाशांनी आपले सामान वाचवण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी आपले सामान पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले.

आठ तास पाण्याखाली

पहाटे तीन वाजता संपूर्ण मुंबई साखरझोपेत असताना सखल भागातील घरांत पाणी शिरले आणि काही मिनिटांतच पाण्याची पातळी वाढू लागली. सकाळी दहा वाजता ओहोटीची वेळ असली तरी मुंबईच्या सखल भागातील पाणी सकाळी अकरा वाजल्यानंतर ओसरले होते. ग्रँट रोडला अलंकार सिनेमागृहाच्या परिसरात, खेतवाडी, लॅमिंग्टन मार्ग या परिसरात दुपापर्यंत पाणी होते.