महाराष्ट्रात राहून उत्तर प्रदेशचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसडेर’ झाल्यावरून राज ठाकरे आणि बच्चन कुटुंबीय यांच्यात झालेल्या वादावर अखेर सोमवारी पडदा पडला. त्यावेळी जे बोललो, त्यावर आजही ठाम आहे. अमिताभ बच्चन हे संपूर्ण भारताचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ आहेत. त्यावेळी जे काही झाले गेले, ते आता सर्व गंगेला मिळाले.
फोटो गॅलरी : राज-अमिताभ वादावर पडदा

 

 

 

 

 

 

 

 

ती गंगाही उत्तर प्रदेशातीलच आहे. त्या गंगेवरही मराठी माणसाचे प्रेम आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी जुन्या वादाला पूर्णविराम दिला. तर राज ठाकरे यांच्या प्रत्येक चांगल्या उपक्रमाच्या मागे आपण उभे राहू, असा आशीर्वाद देत बच्चन यांनीही ‘समेट’ झाल्याचे नक्की केले.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेच्या सदस्यांना विमा संरक्षण प्रदान करण्यासाठी षण्मुखानंद सभागृहाच्या व्यासपीठावर अमिताभ बच्चन सोमवारी राज ठाकरे यांच्यासह उपस्थित होते. अमिताभ बच्चन, राज ठाकरे आणि सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांना प्रातिनिधिक स्वरूपात विमा संरक्षण कार्डे देण्यात आली.
अमिताभ बच्चन यांनी थेट मराठीतून भाषणास सुरुवात करत टाळ्या घेतल्या. ‘एवढय़ा भव्य समारंभाला आमंत्रित करून माझा मानसन्मान केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे आभार..’ ही वाक्ये मराठीत बोलल्यानंतर बच्चन यांनी पुढील भाषण अस्खलित हिंदीत केले. चित्रपटसृष्टीत बॅकस्टेज कलावंतांसाठी असे विमा कवच असावे, ही कल्पना खूपच चांगली आहे. व्यक्तिगत स्वरूपात आम्ही या कलावंतांना मदत करत असतो. मात्र एका संघटनेने या कामी पुढाकार घेणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. राज ठाकरे यांच्यासारख्या कलावंताच्या संघटनेने यात पुढाकार घेतला याचा मला अभिमान आहे. यापुढेही अशा प्रकारच्या विधायक कामासाठी मी त्यांच्या पाठीशी उभा असेन, असे बच्चन यांनी सांगितले. त्यानंतर रसिकाग्रहास्तव त्यांनी ‘अग्निपथ’ ही कविताही सादर केली.
अमिताभ बच्चन यांच्यानंतर बोलण्यास उभ्या राहिलेल्या राज यांनी ध्वनिक्षेपक खाली घेत, ‘एवढय़ा उंचीवरून बोलायची सवय नाही’, असे सांगत बच्चन यांच्या मोठेपणावर मार्मिक भाष्यच केले. हा कार्यक्रम ‘मनसे’चा आहे आणि मंचावर राज ठाकरे असतील, अशी कल्पना अमिताभजींना दिली होती का, असा प्रश्न आपण अमेय आणि शालिनीला विचारला होता, असे सांगताच सभागृहात हास्याची लकेर उसळली. काही वर्षांपूर्वी आमच्यात झालेला वाद हा तात्त्विक होता. त्यांच्याविरोधात माझी वैयक्तिक तक्रार नाही. पण अमितजी हे भारताचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. अमिताभ, लतादीदी, सचिन तेंडुलकर ही परमेश्वराने पाठवलेली माणसे आहेत. त्यांना एका राज्यापुरते मर्यादित ठेवता येणार नाही, असे राज यांनी नमूद केले.